

शिवसेना चिन्ह प्रकरणावर
सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (ता. ५) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेतले.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून दिलेल्या मान्यतेला तसेच विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी सांगितले, की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली आणि २०१३ व २०१८ च्या पक्षघटनेनुसारच पक्षाचे कामकाज झाले. या कालावधीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कधीही आक्षेप घेण्यात आला नव्हता. पक्षघटना निवडणूक आयोगाकडे विधिवत सादर करण्यात आली होती. त्यामुळे ती अस्तित्वात नसल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिब्बल यांनी पुढे सांगितले, की निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाचे असते, विधिमंडळ पक्षाचे नाही. मूळ राजकीय पक्षाच्या अधिकृत मान्यतेशिवाय कोणालाही उमेदवारी किंवा पक्षचिन्ह मिळू शकत नाही. तसेच, आमदारांच्या बहुमताच्या आधारावर राजकीय पक्षाचे नेतृत्व बदलता येत नाही, असेही त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
सुनावणीदरम्यान न्यायालयानेही राजकीय पक्षाचे नियंत्रण हे विधिमंडळ पक्षावर असते, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. राजकीय पक्षाचा वैध निर्णय हा विधिमंडळ पक्षातील बहुमतापेक्षा वरचढ असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
दरम्यान, या प्रकरणावरील पुढील सुनावणी आज (ता. ६) दुपारी २ वाजता होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.