राष्ट्रवादीबरोबर आघाडीबाबत शिवसेनेची उद्या बैठक; पदवीधरचे चित्र स्पष्ट होणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १२ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सहा तर पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारपर्यंत नऊ उमेदवारांनी अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु त्यामध्ये एकाही प्रमुख पक्षाच्या उमेदवाराचा समावेश नाही. दरम्यान भाजप वगळता अन्य प्रमुख पक्षाकडून अद्यापही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले नसले, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बुधवारी (ता.११) उमेदवारांचे नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे. तर या निवडणुकीत स्वतंत्र लढायचे की राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच आघाडी करायची या निर्णयासाठी शिवसेनेची उद्या बैठक होणार आहे. 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १२ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून पदवीधर निवडणुकीसाठी संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार आणि खासदार यांच्या उपस्थितीत देशमुख उद्या अर्ज भरणार आहेत. 

#BoycottAmazon : नेटकरी संतापले; अॅमेझॉनवर हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्र, पायपुसण्या​

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता असली, तरी अरुण लाड यांचे नाव आघाडी असल्याचे बोलले जात आहे. मागील निवडणुकीत त्यांना डावलून सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या लाड यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी चांगली मते घेतल्यामुळे पाटील यांचा थोडक्‍या मताने पराभव झाला होता. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाने त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे यावेळेस त्यांची उमेदवारी पक्षाकडून निश्‍चित समजली जात आहे, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. तर शिवसेनेनेही यंदा पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे देखील पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली आहे.

Bihar Election: 'तेजस्वी' झळकणार अन् 'नितीश'जींची पिछेहाट होणार!​

दरम्यान मंगळवारी एका कार्यक्रमासाठी पक्षाचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुण्यात आले होते. त्यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. या निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडीत लढवायची की स्वतंत्रपणे रिंगणात उतरायचे या संदर्भात बुधवारी पक्षाची बैठक होणार आहे. त्यामध्ये याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. उद्यापर्यंत प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena will meet tomorrow to decide whether to form an alliance with NCP