Bihar Election: 'तेजस्वी' झळकणार अन् 'नितीश'जींची पिछेहाट होणार!

Bihar_Election_Yadav_Kumar
Bihar_Election_Yadav_Kumar

पुणे : बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार यांना 'अँटी इन्कम्बन्सी'चा फटका बसणार असून राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तेजस्वी यादव यांना मोठे पाठबळ मिळेल, अशी चिन्हे मतदानादरम्यानच दिसत होती. 'जेडीयू'पासून भाजपने अंतर राखून प्रचार केल्याचा त्यांना फायदा झाला, असे 'मिटसॉग'तर्फे पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.१०) सांगण्यात आले.

कोरोनानंतरची पहिल्या निवडणुकीची पाहणी करण्यासाठी 'एमआयटी'च्या 'मिटसॉग'चे वरिष्ठ संचालक रवींद्रनाथ पाटील, प्रा. महेश साने आणि 11 विद्यार्थ्यांनी 27 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान बिहारचा दौरा केला. पाटना, छपरा, नालंदा, गया जिल्ह्यांतील सुमारे 55 मतदारसंघांना त्यांनी भेट दिली. मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 'मिटसॉग'ने तेथील राजकीय नेते आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांशी त्यांनी संवाद साधला होता.

बिहारमध्ये नितीशकुमार यांचे सरकार सलग 15 वर्षे सत्तेत होते. 'अँटी इन्कम्बन्सी'चा फटका बसेल, अशी चिन्हे दिसत होतीच. तसेच तेजस्वी यादव यांची युवकांमध्ये 'क्रेझ' होती, असे जाणवले. सोशल मीडियाचा यादव यांनी प्रभावीपणे वापर केला. तसेच त्यांच्या झंझावती प्रचारसभांमुळेही निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात वातावरण ढवळून निघाले, अशी माहिती पाटील यांनी दिली.

नितीशकुमार यांच्या 'जेडीयू'ला काही प्रमाणात फटका बसेल, अशी चिन्हे असल्यामुळे प्रचारात भाजपनेही त्यांच्यापासून काही अंतर राखले होते. भाजपने त्यांच्या प्रचारसाहित्यावर जाणीवपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे मुबलक प्रमाणात वापरली. मोदी आणि नितीशकुमार यांची छायाचित्रे असलेले फ्लेक्‍स अभावानेच आढळले, असेही त्यांनी सांगितले. 'आरजेडी'ने जागा वाटपात कॉंग्रेसला 70 जागा दिल्या. मात्र, कॉंग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे प्रचारातही दिसत होते. त्याचाही फटका 'आरजेडी'ला अप्रत्यक्षपणे बसला, असेही निरीक्षण पाटील यांनी नोंदविले.
कोरोनाचा फटका मतदानाला बसला नाही, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.

पुण्यात कोरोनाचे सुमारे साडेतीन लाख रुग्ण होते. परंतु, संपूर्ण बिहारमध्ये 2 लाख 15 हजार पेक्षा जास्त रुग्ण नव्हते. पाटणा शहराच्या बाहेर तर कोठेही मास्क वापरण्याचे प्रमाण जास्त नव्हते. बिहारमध्ये कोरोनाचा संसर्ग फारसा नसल्यामुळे तेथे कोरोना, लॉकडाउन हे मुद्दे प्रचारात फारसे नव्हतेच. मात्र, भाजपने 'जंगलराज के युवराज' ही तेजस्वी यादव यांना उपमा दिल्यावर, त्यांनी 'नितीशकुमार थकले आहेत, त्यामुळे युवक बेरोजगार झाले आहेत, आता बदल हवा आहे' अशी घोषणा दिली. ती युवकांना भावल्याचेही दिसून आल्याचे पाटील आणि प्रा.साने यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com