शिवाजीनगर बसस्थानक कोंडीत

शुक्रवार, 1 जून 2018

प्रवासी व बसच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या तुलनेने स्थानकातील फलाटांची संख्या कमी पडल्याने कोंडीचा त्रास होत आहे. परंतु, स्थानकात येणाऱ्या गाड्या बाहेर पडण्यासाठी व कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- ज्ञानेश्‍वर रणवरे, आगारप्रमुख, शिवाजीनगर

पुणे - शिवाजीनगर बसस्थानकामध्ये वाहनांची कोंडी होऊ लागली आहे. बस उभ्या करण्यासाठी फलाट मिळत नसल्याने चालकांकडून मध्येच त्या उभ्या केल्या जात आहेत. परिणामी फलाटावरील गाड्या स्थानकाबाहेर पडण्यास विलंब होत आहे. यामुळे प्रवासी व नागरिक त्रस्त झाले आहेत.

 या स्थानकात दररोज दीड हजाराहून अधिक गाड्यांची ये-जा होते. सुट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. स्थानकाचा आकार छोटा आणि बसची संख्या अधिक असल्याने स्थानकात वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येत आहे. बाहेरून येणाऱ्या बसची संख्या वाढली, तर स्थानकाबाहेरील चौकापर्यंत बसची रांग लागते. त्यामुळे चौकातही कोंडी होत आहे. फलाटावर बस उभी करण्यास जागा नसल्याने स्थानकांच्या मध्येच गाड्या थांबवून प्रवाशांची चढ-उतार करावी लागत आहे.

स्थानकातील कोंडीमुळे फलाटावर उभ्या असलेल्या गाड्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे बाहेर जाणाऱ्या बस चालकांकडून कर्कश हॉर्न वाजविले जातात. त्याचे नियोजनही स्थानकाकडून केले जात नाही. गाडीत बसले तरी उन्हामुळे घामाच्या धारा वाहू लागतात. तसेच ठरलेल्या वेळेवर गाडी बाहेर पडत नसल्याने अपेक्षित स्थळी पोचण्यासही उशीर होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

स्थानकात गाड्यांची संख्या वाढल्याने कोंडी तर होते, शिवाय गाड्यांना स्थानकाबाहेर पडण्यास विलंबही होतो. त्यामुळे बसदेखील उशिराने सुटू लागल्याने प्रवाशांना त्रास होतो.
- सखाराम गाडेकर, प्रवासी  

प्रवासी व बसच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या तुलनेने स्थानकातील फलाटांची संख्या कमी पडल्याने कोंडीचा त्रास होत आहे. परंतु, स्थानकात येणाऱ्या गाड्या बाहेर पडण्यासाठी व कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- ज्ञानेश्‍वर रणवरे, आगारप्रमुख, शिवाजीनगर

स्थानकाच्या प्रवेशद्वाराला लागूनच अनेक बस उभ्या केल्या जात होत्या. त्यामुळे त्यांची रांग बाहेरपर्यंत जाते असे. मात्र आता नियोजन बदलले आहे. स्थानकात अधिक काळ थांबणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाल्याने कोंडी सुटेल.
- नीता बाबर, स्थानकप्रमुख, शिवाजीनगर

ये-जा करणाऱ्या बस - 1600
 दैनंदिन प्रवासी - 50,000
स्थानकाची एकूण जागा  1 एकर

Web Title: Shivajinagar bus station pune news