चेहरा कुणाचा काळवंडला, हे जनता सांगेल - आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

‘शरद पवारांना आव्हान दिले नाही’
‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मी कधीही आव्हान दिलेले नाही. त्यांनी २००९ मध्ये माझ्याविरुद्ध उभे राहण्याचे जाहीर केले तेव्हा ते असो वा कुणीही, मी लढणार, असे म्हणालो होतो आणि त्यात काहीही वावगे नव्हते. मी कुणालाही घाबरत नाही, हे सांगणे म्हणजे अहंकार किंवा गर्व नाही. अजित पवार यांच्या आव्हानाला माझे कायम प्रतिआव्हान असेल. घाबरून घरी बसणाऱ्यांमधील मी नाही,’’ असे आढळराव म्हणाले.

शिरूर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुठलेही वक्तव्य राज्यातील जनता गांभीर्याने घेत नाही, हे अनेकदा सिद्ध झाले असतानाही या वाचाळवीराची बडबड राष्ट्रवादी काँग्रेस कशी काय सहन करते, असा सवाल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. 

माझ्या पक्षाचे १८ खासदार आलेत आणि तुमच्या पक्षाचे केवळ चार, त्यात तुमच्या मुलाचा दारुण पराभव झाल्याने चेहरा कुणाचा काळवंडला हे जनता सांगेल, असा टोला त्यांनी लगावला. शिरूर लोकसभेतील पराभवाने आढळराव यांचा चेहरा काळवंडला, बाबाच्या डोक्‍यात हवा गेली होती, असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते, त्याला आढळराव यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. 

ते म्हणाले, ‘‘ज्या मतदारसंघातून मुलाचा पराभव झाला, त्याच मतदारसंघातील सभेत माझा चेहरा काळवंडला म्हणणाऱ्या अजित पवारांना नैतिकता उरलेली नाही. मुलाला निवडून आणता येत नाही, अशा माणसाने माझ्यावर बोलणे हा विनोद आहे. माझे चुलते कधी केंद्रात मोठे मंत्री किंवा मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे माझ्या पराभवाचे फारसे दुःख नाही. कारण, मला पदापेक्षा लोकांचा संपर्क, सहभाग महत्त्वाचा आहे.’’

‘‘शरद पवार यांचा पार्थला उभे करण्यास विरोध होता. मात्र, त्यांनी साहेबांनाही अव्हेरले. दहा- बारा वर्षांत पक्षाचे वाटोळे करायला तेच कारणीभूत आहेत. काही वर्षांपूर्वी पक्षांतर्गत स्वतःचा गट तयार करून साहेबांच्या इच्छेविरुद्ध मुख्यमंत्री होण्याचाही त्यांनी प्रयत्न केला; परंतु त्यांची मस्ती त्यांच्याच नेत्यांनी जिरवली. त्यामुळे त्यांनी माझ्याबाबतीत बोलताना दहा वेळा विचार करावा,’’ असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivajirao Adhalrao patil Talking to Ajit Pawar Politics