esakal | ...आता कोणी उपाशी झोपत नाही; मोफत शिवभोजन थाळीचा गरजूंना होतोय आधार

बोलून बातमी शोधा

Shivbhojan Thali
...आता कोणी उपाशी झोपत नाही; मोफत शिवभोजन थाळीचा गरजूंना होतोय आधार
sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे - सोमवार, वेळ सकाळी ११ वाजता... सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत रांगेत थांबलेले गरीब कामगार, बाहेरगावावरून आलेले विद्यार्थी आणि नोकरदारही... पार्सलमधून दोन चपाती, भाजी, वरण-भात. हे चित्र आहे फरासखाना येथील शिवभोजन केंद्रासमोरील. मोफत शिवभोजन थाळीमुळे संचारबंदीच्या कालावधीत आम्हाला किमान जेवण मिळतेय... आता कोणी उपाशी झोपत नाही... रांगेत थांबलेले कामगार शिरीष गायकवाड ‘सकाळ’ला सांगत होते.

श्री स्वामी समर्थ कृपा स्नॅक्स सेंटरचे (शिवभोजन केंद्र) चालक सोहम जाधव म्हणाले, ‘‘आम्ही सकाळी सात वाजल्यापासून स्वयंपाकाची तयारी करून ११ वाजेपर्यंत शिवभोजन थाळ्यांचे पार्सल तयार करतो. आमच्याकडे सहा कामगार आहेत. सकाळी ११ वाजता ॲपवर ग्राहकाचा फोटो आणि नाव नोंदवून थाळीच्या वितरणाला सुरवात होते. पूर्वी १७५ थाळ्यांची परवानगी होती. आता संचारबंदीमुळे राज्य सरकारने कोटा वाढवून दिला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ असते. पण, दुपारी सव्वाबारा वाजेपर्यंत सर्व २६३ थाळ्या संपून जातात. शिवभोजन थाळीसाठी गरीब, कामगार, बाहेरगावावरून आलेले विद्यार्थी, दुकाने बंद असल्यामुळे तेथील कर्मचारीही येतात. पूर्वी पाच रुपयांना थाळी होती. ती आता मोफत दिली जात आहे. राज्य सरकार एका थाळीमागे सध्या पुरेसे अनुदान देत आहे. त्यामुळे आम्हाला ते परवडते. काही नागरिक सकाळी दुसऱ्या केंद्रावरूनही थाळीचे दुसरे पार्सल घेतात. त्यांच्या रात्रीच्या जेवणाचीही सोय होते. त्यामुळे या वेळी पूर्वीच्या लॉकडाउनसारखी जेवणासाठी भटकण्याची वेळ सहसा कोणावर येत नाही.’’

हेही वाचा: "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचं सरासरी वय ४९ वर्षे"

संचारबंदीच्या काळात काहींचा रोजगार बंद आहे. अशा गरीब कामगारांना जेवण मिळावे, यासाठी राज्य सरकारने मोफत शिवभोजन थाळी सुरू केली आहे. शहर आणि जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. शिवभोजन थाळीतील अन्नाचा दर्जा चांगला असावा, याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे.

- भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी

शिवभोजन केंद्र

एकूण - २६

पुणे शहर - १५

पिंपरी-चिंचवड - ११

दररोज शिवभोजन थाळी वितरण - २९००

केंद्रचालकांना एका थाळीमागे अनुदान - ५० रुपये