Video : अमेरिकेतही दुमदुमला छत्रपतींचा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या अनेक अमेरिकन कॉर्पोरेट जगतात आज भारतीय व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)सारख्या उच्च पदांवर आहेत. त्यामुळे मराठी मुला-मुलींनी व्यवसायात उतरण्याची गरज आहे.
- मनोज शिंदे, उद्योजक

अमेरिकेत शिवजयंती साजरी करणारा अमेरिकेतील हा प्रथम वाणिज्य दूतावास असल्याबद्दल अभिमान आहे. छत्रपती फाउंडेशनच्या भविष्यातील सर्व कार्यक्रमांना सहकार्य दिले जाईल.
- विजयकृष्णन, अधिकारी, वाणिज्य दूतावास

पुणे - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त देश दुमदुमत असतानाच परदेशातही ‘जय शिवाजी, जय भवानी’ ही गाज निनादली. शिवाजी महाराजांची जयंती न्यूयॉर्क शहरातील भारतीय दूतावासात प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्रपती फाउंडेशनतर्फे अमेरिकेत गेली सात वर्षे शिवजयंती साजरी केली जाते. या वर्षी केंद्र सरकारचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल-ताशा ग्रुप यांच्यातर्फे शिवजन्म, शिवराज्याभिषेक उत्सवाचे नाट्य सादरीकरण काल करण्यात आले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, उद्योजक मनोज शिंदे, दूतावासातील अधिकारी ए. के. विजयकृष्णन आदी या वेळी उपस्थित होते. शिवजयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद झेंडे, गौरव दळवी, कल्याण घुले (अल्बानी), अभिनव देशमुख (जॉर्जिया), ऋषिकेश माने (पेनसिल्व्हेनिया), साकेत धामणे (न्यूयॉर्क), प्रशांत भुसारी (टेनेसी), प्रियंका कुरकुरे (न्यूजर्सी), श्रद्धा सहाणे (न्यूजर्सी), सुरेश गायकवाड (कनेक्‍टिकट) आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या महेंद्र सिनारे, रोहन डाबरे, अलिशा मर्चंट यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. फाउंडेशनने डेन्व्हर (कोलोरॅडो) व डलास (टेक्‍सास) येथेही शिवजयंती साजरी केली. तज्ज्ञांनी तरुणांना उद्योजकता आणि करिअरबाबत मार्गदर्शक केले.

video : अवतरली शिवशाही

बघेल म्हणाले, ‘‘छत्तीसगड आणि विदर्भ हे एकाच बेरार प्रांताचे भाग होते आणि आजही मोठ्या प्रमाणात मराठीभाषक छत्तीसगडमध्ये राहतात, असे सांगत महाराष्ट्रासोबत सामाजिक नाळ असल्याचे सांगितले. सातासमुद्रापार आपण इतक्‍या मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी करणे हे कौतुकास्पद आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivjayanti celebration in america