पुण्यात शिवजयंती उत्साहात; पारंपरिक पोशाखात मिरवणुका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

सहभागी शिवभक्तांना मास्कचे वाटप 
पुणे शहरात कोरोनाचे संशयित रुग्ण सापडल्याने महाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे भवानी पेठेतून काढण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी सर्व शिवभक्तांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. खबरदारी म्हणून हे मास्क देण्यात आले होते. त्यामुळे यंदा प्रथमच सर्वांनी मास्क लावून सोहळ्यात सहभाग घेतला.

पुणे - जिवंत देखाव्याचे सादरीकरण, शिवरायांचे मावळे, मर्दानी खेळ, शिवाजी महाराजांच्या वेशातील बालकलाकार, रांजेगावच्या बाबाजी पाटलांवरील जिवंत देखावा, ढोल-ताशा पथकाचा गजर, सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर अशा पवित्र वातावरणात गुरुवारी (ता. १२) शिवभक्तांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर येथून सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली. भवानी मंदिरात शिवरायांची आरती केल्यानंतर भवानी चौकात शिवाजी महाराजांची पालखी आणण्यात आली. येथे ॲड. बाबाजी चव्हाण आणि नगरसेविका मनीषा लडकत यांच्या हस्ते महाराजांच्या पालखीतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. या पालखीत शाहीर दादा पासलकर, वैशाली पाटील, राधिका हरिश्‍चंद्रे, शिवछत्रपती पुरस्कार विजेती सोनम मानकर, काशिनाथ दीक्षित, प्रकाश ढवळे आदी सहभागी झाले होते. या पालखी मिरवणुकीत सुमारे आठ ते दहा मंडळे सहभागी झाली होती. नाना पेठेतील देशप्रेमी मित्रमंडळाने रांजेगावचा बाबाजी पाटील देखावा, हिंदमाता शिवजयंती उत्सव मंडळाने काशी विश्‍वनाथाचा देखावा सादर केला. 

Corona Effect : पुणेकरांनो, तुम्ही परदेशात कुठं कुठं फिरला? प्रशासनाला नक्की सांगा

‘जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशी घोषणाबाजी करत पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. या वेळी महाराजांना पोवाड्यांमधून मानवंदना देण्यात आली. शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. 

पुणे : कोरोनाची अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई; सायबर पोलिसांचा 'वॉच'!

दरम्यान, शिवसेना पुणे शहर शाखेतर्फे नाना पेठेपासून लाल महालापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची कोकणस्वारी आणि औरंगजेब हा जिवंत देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख संजय मोरे, अभय वाघमारे, प्रशांत बधे, डॉ. अमोल देवळेकर, नगरसेविका पल्लवी जावळे आदींसह शेकडो शिवसैनिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayanti celebration in pune