Shivjayanti : किल्ले शिवनेरीवर रंगला शिवजन्म सोहळा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरी.
shivjayanti celebration on shivneri fort
shivjayanti celebration on shivneri fortsakal

जुन्नर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती शासकीय परंपरेनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, आजी माजी पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवजन्मस्थळी मंत्री महोदयांच्या उपस्थीतीत फुलांनी सजविलेल्या पाळण्यात बाल शिवाजी राजांची मूर्ती ठेऊन पाळण्याची दोरी हलवून पाळणा गीत गाऊन पारंपारीक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या निलम ताजणे, उर्मिला बुट्टे पाटील, शिल्पा गुंजाळ, उर्मिला ढोले, रूपाली महाबरे यांनी पाळणा म्हटला. यानंतर जन्मोत्सवानिमीत्त सर्वांना सुंठवडा व प्रसाद वाटप करण्यात आले.

मंत्रीमहोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची विधीवत पुजा करून पालखीला खांदा दिला. पोलिस बँड पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून मानवंदना दिली. पोलिस पथकाने बंदूकीच्या फैरींची सलामी दिली. शेकडो शिवभक्तांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी शिवजन्मस्थळ परिसर दुमदमून गेला होता.

अनेक बालचमू शिवरायांची वेशभूषा करून गडावर आले होते. दुर्गम आदिवासी भागातील मुथाळणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विदयार्थ्यांनी लेझीम खेळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील शिवराज्याभिषेक सोहळा, प्रताप गडावरील पराक्रम, शाहिस्तेखान बोटे छाटली असे विविध प्रसंग सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

किल्ल्यावरील दरवाजांची फुलांची तोरणे लावून सजावट केली होती मात्र पहिल्याच दरवाजाला तोरण नसल्याने शिवभक्त आश्चर्य व्यक्त करत होते. गडाच्या पायथ्यापासून पहिल्या दरवाजापर्यत एसटी महामंडळाने बससेवा उपलब्ध करून दिली होती. शासकीय कार्यक्रमानंतर भगवे फेटे, टोप्या घातलेले हातात भगवा झेंडा घेतलेल्या शिवभक्तांची गडावर गर्दी वाढू लागली होती. पहाटेपासून राज्याच्या विविध भागात शिवज्योती मार्गस्थ होत होत्या. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध समाजसेवी संस्था व संघटनांच्या वतीने पाणी व प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.

पुणे जिल्हयाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार,जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवाई देवीची शासकीय महापुजा करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजणे, शिवाई देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विकास दुराफे, कुसुरचे सरपंच दत्तात्रेय ताजणे, देवस्थानचे पदाधिकारी विश्वस्त उपस्थित होते.

शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने लाखो शिवभक्त भगवा झेंडा हाती घेऊन छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. महाराष्ट्राच्या विविध भागातील शिवभक्त येथून शिवज्योत प्रज्वलीत करून नवी प्रेरणा घेऊन आपापल्या गावी जाऊन शिवजयंती उत्सव साजरा करतात. शिवभक्तांच्या गर्दीने दिवसभर शिवनेरी परिसर फुलुन गेला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com