सत्ता कोणाचीही असो, रस्त्यावर राज्य शिवसेनेचे!

उमेश शेळके - @sumesh_sakal
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

शिवसेनेच्या वाघाची डरकाळी यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत घुमणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत हा ‘आवाज’ उमटण्यासाठी सेनेपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. 

शिवसेनेच्या वाघाची डरकाळी यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत घुमणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत हा ‘आवाज’ उमटण्यासाठी सेनेपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. 

आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर की युतीमध्ये लढवाव्यात, यावरून शहर शिवसेनेत मतभेद आहेत. शिवसेनेचा स्थापनेपासूनचा इतिहास पाहिला, तर युती झाली अथवा नाही झाली, तरी शिवसेनेचा शहर पातळीवरील खरा परफॉर्मन्स हा वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये रस्त्यावर उमटत राहिला आहे. महापालिका किंवा अन्य निवडणुका, ही सेनेसाठी दुय्यम बाब असे; पण हळूहळू ८० टक्के ‘समाजकारण’ पडत गेले आणि राजकारणाचा टक्का वाढू लागला. शहरात शिवसेनेचे दोन आमदार झाले, अनेक जण नगरसेवक झाले, तरी मुंबई-ठाण्याप्रमाणे संपूर्ण शहरात सेना घराघरांत पोचली नाही, हे पुण्यातले वास्तव आहे.

पुणे महापालिकेचा इतिहास पाहिला, तर १९६८ मध्ये शिवसेनेचे पहिले खाते सदाशिव पेठेतून (कै.) शिवाजीराव मावळे यांनी उघडले. तेव्हा शिवसेनेची नुकतीच स्थापना झाली होती. त्यानंतर झालेल्या १९७४ च्या निवडणुकीत सेनेचे सहा नगरसेवक निवडून आले. १९९२ च्या निवडणुकीत त्यामध्ये आणखी दोन जागांची भर पडली. तोपर्यंत सेना ही स्वबळावरच निवडणुकीच्या रिंगणात उतरत होती. १९९७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली. या युतीचा काही प्रमाणात शिवसेनेला फायदा झाला. सेनेचे संख्याबळ वीसपर्यंत पोचले. तेव्हापासून अगदी गेल्या निवडणुकांपर्यंत म्हणजे २०१२ च्या निवडणुकीत युती कायम राहिली. १९९७ ला शिवसेनेला जे यश मिळाले, तेवढे देखील यश पक्षाला पुन्हा मिळविता आले नाही. महापालिकेच्या सभागृहातील पक्षाची संख्या वीसच्या आतच राहिली. स्थापनेपासून मराठी माणसाचा अजेंडा घेणाऱ्या शिवसेनेला मुंबईमध्ये ज्याप्रमाणे यश मिळविता आले, तसे मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या पुण्यात मात्र मिळविता आले नाही. कारण मुंबई मध्ये कॉस्मोपॉलिटन समाज मोठ्या प्रमाणावर होता, त्यामुळे मराठीजनांवरील अन्यायाच्या घोषणा तेथे अपील होतात.  पुण्यात मात्र सर्वच पक्षांत मराठीजनच असल्याने या मुद्द्यावर यश मिळाले नाही, असे एक कारण सांगितले जाते. त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य असले, तरी अन्य कारणेही त्यामागे आहेत. 

सेनेत कायमच प्रस्थापितांना डावलून तळागळातील नेतृत्वाला त्यांनी संधी दिली. त्यामुळे संघटना म्हटले, की शिवसेना एकत्र व्हायची; परंतु पुण्यात पक्षनेतृत्वाकडून विशेष लक्ष दिले गेले नाही. त्यातून पुण्यातील शिवसेना कायमच तळ्यात-मळ्यात राहिली. त्यामुळेच पक्षाबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती असूनदेखील त्यांचे मतात परिवर्तन करण्याचे आव्हान पक्षापुढे कायमच राहिले. मुंबई, ठाणे, औरंगाबादसारखी पुण्यात शिवसेना तेवढ्या ताकदीने उभी राहू शकली नाही. पुणे पॅटर्न अस्तित्वात आल्यानंतरही त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि भाजपला मिळाला. तेवढा फायदा शिवसेनेला झाला नाही. शिवसेनेत फूट पडून मनसे स्थापन झाली. शिवसेनेच्या मतांमध्ये मोठी विभागणी झाली. गेल्या निवडणुकीत महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान या पक्षाने मिळविले. मात्र शिवसेनेला हे अद्याप शक्‍य झाले नाही. त्यात शिवसेनेत गटबाजीही निर्माण झाली आहे. 

या आव्हानांबरोबरच शिवसेनेला काही संधीही आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये आव्हान देणाऱ्या मनसेला यंदा गळती लागल्याचे बोलले जाते. त्यामुळे गेल्या निवडणुकीत मनसेकडे गेलेली मते खेचून घेतल्यास आपली वोट बॅंक अधिक मजबूत करता येईल.

Web Title: shivsena party review