‘राडा’ संस्कृती काँग्रेसला न शोभणारी; शिवसेनेचा निशाणा

Untitled-1.jpg
Untitled-1.jpg

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने काॅंग्रेस शिवसेनेमधील अनेक नेते नाराज असल्याचे चित्र समोर येत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने पुण्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी काँग्रेस भवनमध्ये 'राडा' घातला. थोपटे समर्थकांकडून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आलेल्या कार्यकर्त्यांच्या जमावाने काँग्रेस भवनवर जोरदार दगडफेक करून तोडफोड केल्याचा प्रकार घडला होता. यावरून आता शिवसेनेनं टीका केली आहे.

दरम्यान, प्रत्येक मंत्रिमंडळ विस्तारानंतर असंतोषाच्या अशा वावटळी उठतच असतात, ठिणग्या उडतच असतात. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेत ‘इच्छुकां’ची मांदियाळी मोठी होतीच. त्यातून निवड करावी लागली, पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून त्यांच्या समर्थकांनी ‘राडा’ केला, असं म्हणत शिवसेनेनं थोपटे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

या प्रकरणानंतर विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी त्यांनी त्या दाबून ठेवल्या पाहिजेत, असा सल्ला शिवसेनेनं विरोधकांना दिला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून थोपटे आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

अग्रलेखात काय...
काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेत ‘इच्छुकां’ची मांदियाळी मोठी होतीच. त्यातून निवड करावी लागली, पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांच्या समर्थकांनी ‘राडा’ केला. ‘राडा’ हा शब्द काँग्रेस संस्कृतीला शोभत नाही, शिवसेनेवर ‘राडेबाज’ असा शिक्का काँग्रेसने अनेकदा मारला, पण थोपटे यांच्या समर्थकांनी केलेले कृत्य ‘राडा’ संस्कृतीत मोडणारे आहे.

थोपटे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली व नंतर निषेधही केला इथपर्यंत ठीक. नंतर संताप अनावर झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचेच बॅनर्स जाळले. त्याही पुढे जाऊन हे सर्व लोक पुण्यात पोहोचले व त्यांनी जिल्हा काँग्रेस कार्यालयावरच हिंसक हल्ला केला. कार्यालयाची मोडतोड केली. नेत्यांच्या तसबिरी फोडून चक्काचूर केल्या. काँग्रेस नेत्यांचा अर्वाच्य भाषेत उद्धार केला. संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात घेतले नाही याबाबत ही खदखद असली तरी समर्थकांनी ज्याप्रकारे ही खदखद बाहेर काढली ती काँग्रेस संस्कृतीत मोडणारी नाही.

मंत्रिपदाशिवाय राजकारण सुने व जीवन उणे अशा वातावरणाचे हे फळ आहे. एकही राजकीय पक्ष या वातावरणापासून मुक्त नाही. काँग्रेस पक्षात प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद मिळाले नाही. त्या कर्तबगार आहेत व मंत्रीपदासाठी योग्य होत्या, पण काँग्रेसच्या वाट्याला जो ‘बारा’चा कोटा आला त्यात त्यांना बसवता आले नाही. त्यामुळे त्यांचे समर्थकही नाराज झाले व त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधींना रक्ताने पत्रे लिहिली. शिंदे परिवाराचे काँग्रेसशी रक्ताचे नाते आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून देशाच्या गृहमंत्री पदापर्यंतची सर्व पदे सुशीलकुमार शिंदे यांना गांधी परिवार आणि काँग्रेसमुळेच भूषवता आली, हे प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांनी समजून घेतले पाहिजे व रक्त वाया घालवण्यापेक्षा ते पुढच्या राजकीय युद्धासाठी जपून ठेवले पाहिजे.

काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने ‘पाठिंबा’ देणाऱ्या घटक पक्षांवर मेहेरनजर केल्याचे दिसत नाही. हे काम शिवसेनेने केले. राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचा धक्का दिला. आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणास राम राम ठोकण्याची त्यांची घोषणा सनसनाटी ठरली. मात्र नंतर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी त्यांची समजूत घातली आणि आता प्रकाश सोळंकेंची नाराजीही दूर झाली आहे. सगळे ठीकठाक आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा काहीजणांसाठी आनंदवार्ता असली तरी हायकमांडसाठी डोकेदुखी ठरत असते. तरी बरे ठाकरे सरकारने विस्तारात सगळ्या जागा भरल्या. दोन-चार जागा शेवटपर्यंत शिल्लक ठेवून नाराजांना गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत राहायचे हे धंदे मुख्यमंत्र्यांनी केले नाहीत. एक मजबूत आणि अनुभवी मंत्रिमंडळ सत्तेवर आले. त्यांना काम करू द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com