पंचनामा करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे शोले स्टाईल आंदोलन 

chikhali
chikhali

चिखली :  स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी प्रकल्पावर मार्केटींग फेडरेशन आणि नाफेडच्या मार्फत हमीभावाने शासनातर्फे तूर खरेदी सुरू होती. ही तूर खरेदी 15 मे 2018 ला बंद झाली. मात्र शनिवारी (ता.1) रात्री अचानक नाफेडच्या ताब्यात असलेल्या गोडावूनमध्ये जवळपास 3 हजार क्विंटल तूर आणून टाकण्यात आल्याची माहिती रयत क्रांती संघटनेला मिळाली. यावरून रयत क्रांती संघटनेने जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक बुलडाणा, तहसीलदार चिखली, ठाणेदार चिखली आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना निवेदन देवून टीएमसी मार्केट यार्डातील गोडावून नंबर 3 मध्ये असलेल्या ह्या तुरीच्या मालाचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शासनाकडून उडीद, तूर, हरभरा अशा शेतमालाचे हमीभावाने खरेदी नाफेडमार्फत करण्याची योजना सुरू करण्यात आली. विदर्भ मार्केटींग फेडरेशनने तालुक्यामध्ये नाफेडमार्फत खरेदी करण्यासाठी चिखली तालुका सहकारी जिनींग प्रेसिंग फॅक्टरीला सबएजंट म्हणून हे काम सोपविले. शासनाच्या आदेशानुसार खरेदी बंद होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंंत 37 हजार 467 क्विंटल तूर या योजनेमार्फत चिखली केंद्रावर खरेदी करण्यात आली. शासनाची मुदत संपल्याने जवळपास 30 हजार क्विंटल तूर शेतकर्‍यांनी या केंद्रावरून परत नेली.

हे खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून या ठिकाणी शेतकर्‍यांवर अन्याय होत असून शेतकरी नसलेल्या लोकांकडून तुरीचा माल हमीभावाने खरेदी केला जात असल्याचा आरोप सातत्याने होत राहिला. त्यामुळे नाफेडमार्फत सुरू असलेली ही तूर खरेदी कायमच वादाच्या भोवर्‍यात सापडलेली होती. खरेदी केलेल्या तुरीच्या शेतमालाची साठवणूक वेअर हाऊसला करून तशी नोंद संबंधित एजन्सींकडे केल्याचे मार्केटींग फेडरेशनच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात येते. 

 मात्र बाजार समितीचे जे गोडावून सबएजंट संस्थेच्या ताब्यात आहे त्या गोडावून नंबर 3 मध्ये 3 हजार क्विंटल तूर साठविल्या गेल्याची माहिती रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांना मिळताच त्यांनी या माहितीमधील वास्तव तपासून पाहण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय गाठून या अचानक साठवल्या गेलेल्या तुरीचा पंचनामा करण्याची मागणी लावून धरली. शासनाच्या निर्णयानुसार तूर खरेदी बंद होण्याची वेळ उलटून तीन महिन्यांनंतर अचानक आलेला हा एवढा मोठा तुरीचा साठा नेमका कोणाचा, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या शेतमालाचा पंचनामा करण्याच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालयात ठिय्या मांडून बसले.

मात्र, सबएजंट असलेल्या  जिनींग संस्थेच्या कर्मचार्‍यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने गोडावून उघडून पाहता आले नाही. अखेर तहसीलदार, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि बाजार समितीचे सचिव यांच्या आदेशाने व त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष गोडावून नंबर 3 च्या चारही कुलूपांना सील लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात सर्व संबंधीतांना रयत क्रांती संघटनेने निवेदन देवून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर विनायक सरनाईक, दिपक सुरडकर, विलास तायडे, प्रमोद मुळे, रविराज टाले आदींच्या स्वाक्षरी आहेत.

 अधिकारी मात्र नॉट रिचेबल...
नाफेड खरेदीच्या सबएजंट असलेल्या जिनिंग संस्थेच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या टीएमसी प्रकल्पावरील गोडावुन नंबर 3 मध्ये तीन हजार क्विंटल तुर आणुन टाकल्याच्या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी अधिकार्‍यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे भ्रमणदुरध्वनी नॉट रिचेबल असल्याचे निदर्शनास आले. तर तालुका स्तरावरील वरीष्ठांनी या प्रकाराबाबत रयत संघटनेची तक्रार प्राप्त झाल्याचा दुजोरा अधिकार्‍यांनी दिला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com