दुकानांनाही रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी द्या : महापौर मोहोळ

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 9 October 2020

बाजारपेठेतील अर्थचक्राला गती देण्यासाठी दुकानांची वेळ दोन तासांनी वाढवून रात्री नऊ वाजेपर्यंत ती उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

पुणे : बाजारपेठेतील अर्थचक्राला गती देण्यासाठी दुकानांची वेळ दोन तासांनी वाढवून रात्री नऊ वाजेपर्यंत ती उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. पालकमंत्री अजित पवार या बाबत महापालिकेला काय आदेश देतात, या कडे पुण्यातील नागरिक, व्यापारी यांचे लक्ष लागले आहे.

17 ऑक्टोबरला नवरात्र सुरू होत असून 25 ऑक्टोबरला दसरा आहे, तर 14 नोव्हेंबरला दिवाळी आहे. या सणासुदीच्या काळामध्ये नागरिक घराबाहेर खरेदी करण्यासाठी पडू शकतात. परंतु दुकाने सायंकाळी सात वाजता बंद असल्यामुळे त्यांना अनेक मर्यादा येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत आहे. त्याची दखल घेऊन दुकाने सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. राज्य सरकारने दोन ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशामध्ये दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील असे म्हटले आहे.

परंतु, महापालिका याबाबत स्वतंत्रपणे दोन तास वाढवण्यासाठी निर्णय घेऊ शकते. सामाजिक अंतराचे पालन करून दुकानदार कर्मचारी आणि ग्राहकांची काळजी घेऊ शकतात. त्यासाठी महापालिका त्यांना विशेष सूचनाही देऊ शकते. त्याचा अवलंब करून दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत खुली करण्यासाठी तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी महापौरांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. दुकानांच्या वेळेची परवानगी वाढवली नाही तर बाजारपेठेला आर्थिक फटका बसू शकतो, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. 

शहरात हॉटेल बार आणि मॉल यांना रात्री दहा वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी आहे. मात्र दुकानांच्या बाबतीत महापालिकेने  सायंकाळी सात वाजता बंद करण्याचा आदेश दिला आहे. शहरातील पोलिस यंत्रणाही सर्व दुकाने सातला बंद करण्यासाठी दुकानदारांना भाग पाडत आहेत.

 महापालिकेच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे तसेच व्यापारीही संतप्त झालेले आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून नागरिक घरांमध्येच बसून होते आता घराबाहेर पडू लागलेले असताना बाजारपेठेतील दुकानांच्या वेळेच्या निर्बंधामुळे त्यांची गैरसोय होत आहे. त्याचा फटका शहरातील तसेच उपनगरातील दुकानदार आणि ग्राहकांनाही बसत आहे याबाबत पुणे व्यापारी महासंघ, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन यांनीही महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना पत्र दिलेले आहे. दरम्यान पालकमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये याबाबत बैठकीमध्ये काय आदेश देतील, या कडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shops should allow at night 9 said by muralidhar Mohol