कमी उंचीचा दुभाजकही अपघातास कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

पुणे- सोलापूर मार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर झालेल्या अपघातामध्ये नऊ जणांच्या मृत्यूस कमी उंचीचा दुभाजक हे प्रमुख कारण ठरले आहे.

पुणे - पुणे- सोलापूर मार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर झालेल्या अपघातामध्ये नऊ जणांच्या मृत्यूस कमी उंचीचा दुभाजक हे प्रमुख कारण ठरले आहे. लोणी काळभोर टोल नाका ते कासुर्डी टोल नाका या सुमारे २५ किलोमीटरच्या टप्प्यात सहा इंच उंचीचा दुभाजक आहे. स्थानिक नागरिकांनी दुभाजकाची उंची वाढविण्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही, प्रशासनाने त्याकडे आजवर दुर्लक्षच केले आहे.  

पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रक-कारचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

हडपसरपासून काही किलोमीटर गेल्यानंतर लोणी काळभोर टोल नाका सुरू होतो. त्यापासून ते कासुर्डी टोल नाक्‍यापर्यंतच्या २५ किलोमीटरच्या मार्गावर अवघा सहा इंच इतक्‍या उंचीचा आणि दोन- चार फूट इतक्‍या रुंदीचा दुभाजक आहे. फॉर्च्युनर, इनोव्हा, स्कॉर्पिओ, जीप आदी मोठ्या गाड्यांसह एसटी, बस, ट्रक आदी मोठी वाहने अपघातानंतर सहजरीत्या कमी उंचीच्या दुभाजकावरून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन, समोरून येणाऱ्या वाहनांवर आदळत असल्याची  सद्यःस्थिती आहे.  

दीड वर्षापूर्वी लोणी काळभोरजवळील कोरेगाव मूळ या ठिकाणी याच पद्धतीने झालेल्या अपघातामध्ये १२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. कमी उंचीचा दुभाजक तोडून मोठी वाहने विरुद्ध बाजूस जाऊन अपघात होत असतानाही प्रशासन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचे वास्तव आहे. हा प्रश्‍न लक्षात घेऊन दुभाजकाची उंची वाढवावी, यासाठी स्थानिक ग्रामपंचायती अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्यात अद्याप यश आले नाही. 

म्हणून दुभाजक कमी उंचीचा !
‘बांधा आणि वापरा’ यानुसार ‘आयआरबी’ने २००० मध्ये लोणी टोल नाका ते कासुर्डी टोल नाक्‍यादरम्यान रस्ता बांधणीचे काम केले. त्या वेळी महामार्गाच्या मध्यभागी कमी उंचीचा दुभाजक केला. मागील १९ वर्षांत रस्त्याची देखभाल- दुरुस्ती केल्यानंतर या दुभाजकाची उंची आणखीनच  कमी झाली.

 सध्या केवळ सहा इंच इतक्‍या उंचीचे दुभाजक आहेत. १० मार्च २०१९ या दिवशी ‘आरआरबी’चा करार संपल्याने या महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचए) आली आहे. मात्र, त्यानंतर दुभाजक उंचीचा प्रश्‍न दूरच, या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याची सद्यःस्थिती आहे.  

सव्वा लाख जीव धोक्‍यात ! 
सोलापूर रस्त्यावरील हडपसर ते कासुर्डी फाटा या मार्गावर कदमवाक वस्ती (२० हजार लोकसंख्या), लोणी काळभोर (२५ हजार), कुंजीरवाडी (१२ हजार), उरुळी कांचन (६० हजार) ही चार मोठी गावे आहेत. या गावांची लोकसंख्या सव्वा लाखामध्ये आहे. शाळा, हॉस्पिटल, बाजार, रेल्वे, बस-एसटी थांबे, पोलिस ठाणे आदी वेगवेगळ्या कारणांसाठी दररोज नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतो. मात्र, अतिवेगामध्ये येणाऱ्या छोट्या वाहनांसह मोठ्या वाहनांमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.  

वाहनांच्या गतीवर मर्यादा नसल्याने अनेकदा अपघात होऊन, त्यामध्ये वाहनचालकांसह स्थानिकांचा जीव गेला आहे. दुभाजकाची उंची वाढवून सेवा रस्ता करावा, यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही सरकारकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींचेही या प्रश्‍नाकडे लक्ष नाही.
- हिरामण रामचंद्र ओझरकर, माळीमळा, कदमवाकवस्ती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Short divider causes of pune solapur road accidents