पुणे जिल्ह्यात कांदा बियाणांचा तुटवडा; अतिवृष्टीने रोपे गेली वाहून

Shortage of onion seeds in Pune district due to heavy rain
Shortage of onion seeds in Pune district due to heavy rain

पुणे :  जिल्ह्यातील कांदा लागवडीसाठी आवश्‍यक असलेली कांद्याची रोपे ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने वाहून गेली आहेत. यामुळे रोपांअभावी कांदा लागवडी अडचणीत आली आहे. दरम्यान, ही रोपे पुन्हा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना कांद्याचे बियाणे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे केल्या आहेत. यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतही सर्वपक्षीय सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करत, कांदा बियाणे तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनाही याबाबत साकडे घालण्यात आले आहे. अतिवृष्टीत सुमारे 15 हजार हेक्‍टरवरील कांदा रोपे वाहून गेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने रोपांची निर्मिती करावी लागणार आहे. मात्र या नवीन रोपांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक कांदा बियाणे बाजारात उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने हे बियाणे तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अध्यक्षा पानसरे यांनी भुसे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात 61 हजार 816 हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात आली होती. यासाठी 78 क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला होता. याशिवाय शेतकऱ्यांनी स्वतः निर्मित केलेल्या बियाणे हे 100 क्विंटलहून अधिक होते. तसेच गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात रोपांची दुबार निर्मिती करण्याची गरज भासली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी बियाणांचा पुरवठा सुरळीत झाला होता. यंदा मात्र नेमके याच्या उलट चित्र आहे. गेल्या वर्षी कांद्याला भाव आल्याने, शेतकऱ्यांनी घरच्या घरी बियाणांची निर्मिती केली नाही. त्यातच यंदा अतिवृष्टीने कांदा रोपे वाहून गेली आहेत. यंदाच्या रब्बी हंगामात कांदा पिकाचे सरासरी क्षेत्र 50 हजार 177 हेक्‍टर आहे.

कांदा बियाणे तुटवड्याची प्रमुख कारणे
- चालू वर्षीच्या पावसाळ्यात कांदा रोपांचे नुकसान.
- पाऊस संपल्यानंतर निर्माण केलेली रोपे अतिवृष्टीने वाहून गेली.
- शेतकरी निर्मित कांदा बियाणे गतवर्षीच्या तुलनेत यंदा खूप कमी.
- रोपांच्या दुबार निर्मितीमुळे बियाणांच्या पुरवठ्यात तूट.
- गतवर्षीच्या तुलनेत मागणीत दुप्पटीने वाढ.
- गेल्या वर्षी कांद्याला भाव मिळाल्याने बियाणे निर्मितीत मोठी घट


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com