esakal | परदेशात नोकरीचा ‘शॉर्टकट’ पडला महागात
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

परदेशात नोकरीचा ‘शॉर्टकट’ पडला महागात

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे - संगणक अभियंता (Computer Engineer) असलेल्या विजयच्या (नाव बदलले आहे) ई-मेलवर अचानक एक मेल आला, ‘परदेशात राहण्यासाठी घर, चांगल्या पगाराची नोकरी अन् प्रवासासाठी कार’. त्यानेही त्या ई-मेलला तत्काळ प्रतिसाद (Response) दिला. काही दिवसांतच त्याच्याकडून प्रक्रिया शुल्क, विमान प्रवास, निवासासाठी ऑनलाइन पाच लाख रुपये घेण्यात आले, तरीही पैशांची मागणी सुरूच होती. आपली फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात येताच विजयने पोलिसांकडे (Police) धाव घेतली. अशा पद्धतीने गेल्या सात महिन्यांत एक-दोन नव्हे तर ५२५ जणांना चांगल्या नोकरीसाठीचा ‘शॉर्टकट’ महागात पडला असून, सायबर गुन्हेगारांनी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. (Shortcut of a Job Abroad Became Expensive)

असा करतात गुन्हा....

कोरोनामुळे एकीकडे रोजगार गेलेले, व्यवसायही बंद पडले. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तरुणांकडून नोकरी मिळण्यासाठी धडपड केली जाते. नेमक्‍या अशाच तरुण-तरुणींना सायबर गुन्हेगार सावज ठरवितात. इंटरनेटवर उपलब्ध नोकरीसंबंधीच्या वेब पोर्टलवर आपली इत्यंभूत माहिती भरून तरुण-तरुणी मोकळे होतात. सायबर गुन्हेगार तेथूनच संबंधित माहिती घेऊन बनावट कंपन्या, बनावट ई-मेल आयडी तयार करून तरुणांना नोकरीचे मेल पाठवितात. तरुण आपल्या जाळ्यात अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याकडून शेवटपर्यंत पैसे उकळण्यावर भर देतात. पैसे देण्यास नकार दिल्यास पोलिसात गुन्हे दाखल करण्याची, जीवे मारण्याची धमकी देतात. अशा प्रकारांना घाबरून तरुण त्याकडे दुर्लक्ष करतात.

हेही वाचा: गोळीबाराचा बदला घेण्यासाठी नगरसेवकानेच दिली आरोपीच्या खूनाची सुपारी

तपासासाठी स्वतंत्र पथके

पुणे सायबर पोलिसांकडे मागील सात महिन्यात या गुन्ह्यांशी संबंधित ५२५ तक्रार अर्ज आले आहेत. या अर्जांची दखल घेऊन पोलिस स्वतंत्र पथके तयार करून तपास करतात. नागरीकांनी फसवणूक झाल्यानंतर तत्काळ प्रतिसाद दिल्यास त्यांची गेलेली रक्कम परत मिळण्याची चिन्हे असतात. त्यासाठी सायबर पोलिसांकडून प्रयत्न केले जातात.

पोलिसांनी केले कॉल सेंटर उद्‌ध्वस्त

नोकरीविषयक फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी १५ दिवस दिल्लीत मुक्काम ठोकला होता. त्यामध्येच पोलिसांनी दिल्लीत ‘जॉब फ्रॉड’साठी कॉल सेंटरवर छापा टाकून कॉल सेंटर उद्‌ध्वस्त केले. तेथून चौघांना बेड्या ठोकल्या. नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची ऑनलाइन फसवणूक करण्याचा प्रकार त्यांच्याकडून सुरू होता.

हेही वाचा: ‘नॅक’कडून आकारण्यात येणारे मूल्यांकनाचे शुल्क झाले कमी

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी...

  • नोकरी देणारी व्यक्ती, कंपनीची पडताळणी करा

  • लठ्ठ पगाराचा लोभ टाळा

  • शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर कौशल्यांचा विचार करा

  • अनोळखी ई-मेल, लिंकला प्रतिसाद देऊ नका

  • नोकरीसाठी अर्ज करताना वैयक्तिक माहिती बाहेर फुटणार नाही, याची दक्षता घ्या

  • ५२५ सायबर पोलिसांकडे आलेले तक्रार अर्ज

  • ३१० चौकशीसाठी पोलिस ठाण्यांना पाठविलेले अर्ज

  • ६४ सायबर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे

नोकरीच्या आमिषाला उच्चशिक्षितच नाही, तर सर्वसामान्य नागरिकही फसतात. चांगल्या पगाराच्या लोभामुळे नागरिक पैसे गमावतात. अशा ई-मेलला प्रतिसाद देण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळली पाहिजे. संशयास्पद असल्यास पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस

आखाती देशात नोकरी मिळेल, असा ई-मेल मला आला होता. त्यांना प्रतिसाद दिल्यानंतर त्यांनीच मला ७० ते ८० हजार रुपये भरायला सांगितले. परंतु, सहा महिन्यांनंतरही नोकरी मिळाली नाही आणि पैसेही गेले.

- आकाश गोळे

इथे साधा संपर्क

व्हॉटसॲप क्रमांक - ७०५८७१९३७१, ७०५८७१९३७५

सायबर पोलिस ठाणे - ०२०- २९७१००९७

ई-मेल - crimecyber.pune@nic.in

loading image