बाबूजींनी निर्माण केलं स्वत:चं युग

बुधवार, 25 जुलै 2018

आपल्या भावपूर्ण गायकीनं, अवीट गोडीच्या संगीतानं एक युग निर्माण करणारे सुधीर फडके म्हणजेच बाबूजींची जन्मशताब्दी आज (ता.25)पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांचे पुत्र व संगीतकार-गायक श्रीधर फडके यांनी "सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलेल्या या भावना. 

प्रश्‍न - आजच्या कर्कश्‍श वाटणाऱ्या आणि शब्दांना दुय्यमत्व देणाऱ्या अनेक संगीतरचना ऐकताना बाबूजींचं वेगळेपण कसं वाटतं? 
श्रीधर फडके -
 
बाबूजींचं संगीत मधूर होतं. चाली गोड असत, पण त्या म्हणायला तेवढ्याच अवघड. "बाई मी विकत घेतला श्‍याम,' या गीतात श्‍यामराव कांबळे यांचे हार्मोनियमवरचे सूर येतात आणि त्यानंतर बाबूजींनी मारूबिहाग रागात घेतलेला आलाप येतो. दोन अंतरे आणि मुखड्यामधील सेतू म्हणून हा आलाप काम करतो. प्रतिभा, सर्जनशीलता हे त्यांचं वैशिष्ट्य. गाण्याचा ते सखोल अभ्यास करत.त्यांच्याकडे वैविध्य होतं. त्यासाठी "खूश हैं जमाना आज पहिली तारीख हैं' हे गीत पाहा. गदिमांच्या शब्दांना त्यांनी सुंदर न्याय दिला. "त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे', या शब्दांतून ते झोपडं लांबवर आहे, ते बाबूजी दाखवून देतात. "सांग तू माझा होशील का', यांतील "तू' या शब्दाचा दीर्घ उच्चार ते जाणीवपूर्वक करत. 

भावगीतांपासून ते लावणीपर्यंतची विविध गीतं बाबूजी उत्कृष्टरीत्या करीत. वा. रा. कांत, गदिमा, ना. घ. देशपांडे, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे यांच्या भावगीतांना प्रसंगानुरूप चाली त्यांनी बांधल्या. हिंदीतही नरेंद्र शर्मा, कमर जलालाबादी, भरत व्यास यांच्या शब्दांना त्यांनी स्वरसाज चढवला. "जाळीमदी पिकली करवंदं', "चिंचा आल्यात पाडाला' यांसारख्या बहारदार, ठेकेदार लावण्याही त्यांनी केल्या. 

"" मधूर संगीत हे वैशिष्ट्य असलेल्या, शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया असलेल्या बाबूजींचं वेगळेपण उठून दिसतं. भरीव सामाजिक काम, गोवा-दादरा-हवेली मुक्तिसंग्रामातील सहभाग, या पैलूंनी बाबूजींच्या व्यक्तिमत्त्वाची उंची दिसून येते. त्यांचा पुतळा उभारण्यापेक्षा एखाद्या नव्या नाट्यगृहाला त्यांचं नावं द्यावं, तसंच त्यांच्या नावानं एखादं ग्रंथालय असावं, अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील.'' 
- श्रीधर फडके 

प्रश्‍न - राजा परांजपे, गदिमा आणि बाबूजी यांच्या कालखंडाविषयी थोडंसं सांगा. 
श्रीधर फडके - 
या त्रिमूर्तीनं सुवर्णयुग आणलं. राजाभाऊंचे चित्रपट, गदिमांचे शब्द आणि बाबूजींचं संगीत हे मिश्रण विलक्षणच होतं. "जिवाचा सखा', "लाखाची गोष्ट', "उनपाऊस', "जगाच्या पाठीवर', असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले. "एक धागा सुखाचा', "जग हे बंदिशाला', यांसारखी अजरामर गीतं त्यातून जन्माला आली. 

प्रश्‍न - वडील म्हणून बाबूजींचं वर्णन तुम्ही कसं कराल? 
श्रीधर फडके -
वडील म्हणून ते प्रेमळ, पण शिस्तप्रिय होते. त्यांनी माझ्यावर उत्तम संस्कार केले. वागावं कसं-साधेपणा कसा असावा, ते शिकवलं. 

प्रश्‍न - बाबूजींच्या समाज आणि देशप्रेमाबाबत सांगा. 
श्रीधर फडके - 
देशासाठी काही तरी करणं हे आपलं कर्तव्य आहे, अशी त्यांची भावना होती. कोयनेच्या 1967 मधील भूकंपानंतरच्या निधिसंकलन कार्यक्रमाआधी ते विदर्भातून परतत होते. रात्रीच्या प्रवासात कानाला वारा लागून नसा दुखावल्या आणि त्यांचं तोंड वाकडं झालं, पण तरीही "माझ्या दुःखापेक्षा त्यांचं दुःख मोठं आहे,' असं म्हणत जिद्दीनं त्यांनी कार्यक्रम पूर्ण केला. एका दलित भगिनीवर अत्याचार झाल्यावर त्यांनी हुतात्मा चौकात उपोषण केलं. गोवा, तसंच दादरा-नगर-हवेली मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला होता. "आम्ही कदाचित परत येणार नाही,' असं सांगून त्यांनी घर सोडलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट झाल्याशिवाय मी जग सोडणार नाही,' असा त्यांचा निर्धार होता आणि तो त्यांनी पाळला. त्याआधी त्यांनी "वंशाचा दिवा', "विठ्ठल रखुमाई', तसंच "हा माझा मार्ग एकला' हे चित्रपट केले. 

प्रश्‍न - गीतरामायणाला अजूनही अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे, याचे रहस्य काय? 
श्रीधर फडके - 
मराठी माणसानं जिला प्रेमानं स्वीकारलं अशी गीतरामायण ही कलाकृती. गदिमांची सोपी भाषा आणि त्या शब्दांना दिलेल्या, हृदयापर्यंत पोचणाऱ्या चाली यांमुळे हा प्रतिसाद मिळाला. "अशी गीतं आम्हाला मिळायला हवी होती,' असं बालगंधर्व म्हणत. मी स्वतः गेली अनेक वर्षे ही गीतं गाण्याचा प्रयत्न करतोय, त्या वेळी या दोघांनी हे नेमकं केवढं विलक्षण काम करून ठेवलंय, याची जाणीव होते. रामचंद्र, सीता, भरत, हनुमंत, बिभीषण, शूर्पणखा अशा विविध व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेली गीतं वेगवेगळ्या प्रसंगांतली आहेत. त्यामुळं त्यांच्या चालींमध्येही तसंच वैविध्य आहे. शूर्पणखेचं "सूड घे त्याचा लंकापती', हे गीत घ्या. त्यात तिचा संताप व्यक्त तर झालाच आहे, पण त्यातही रामाचं वर्णन करताना "तो रूपाने सुंदर श्‍यामल' या ओळी ती म्हणते, तेव्हा चालीतला बदल आणि स्वरांत आणलेला गोडवा पाहा. 

प्रश्‍न - बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षातील नियोजन काय ? 
श्रीधर फडके -
 "बाबूजींची गाणी'चे पाच प्रयोग आतापर्यंत झाले असून, वर्षभरात वेगवेगळ्या गावांत ते होतील. त्याचप्रमाणं गीतगायनाच्या स्पर्धा कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक अशा काही निवडक ठिकाणी होतील. बाबूजींचा पुतळा उभारण्यापेक्षा नव्या नाट्यगृहाला त्यांचं नाव द्यावं, त्यांच्या नावाचं संगीतावरील पुस्तकांचं संग्रहालय असावं, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करीत आहोत.

Web Title: Shridhar Phadke Interview