महापालिकेत सभागृह नेतेपदी श्रीनाथ भिमाले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

पुणे - महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचा गटनेता म्हणून श्रीनाथ भिमाले यांची सोमवारी नियुक्ती झाली. भिमाले आता महापालिकेत सभागृह नेतेपदाची जबाबदारी पार पाडतील. 

पुणे - महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचा गटनेता म्हणून श्रीनाथ भिमाले यांची सोमवारी नियुक्ती झाली. भिमाले आता महापालिकेत सभागृह नेतेपदाची जबाबदारी पार पाडतील. 

महापालिकेत भाजपचे पहिल्यांदाच 98 सदस्य निवडून आल्याने भाजपचा गटनेता कोण होणार, याबद्दल औत्सुक्‍य होते. गटनेता निवडीसाठी भाजपचे निरीक्षक म्हणून खासदार सुभाष देशमुख पुण्यात आले होते. त्यांनी रविवारी नगरसेवकांची बैठक घेतली; तसेच पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार, आमदार यांच्याशीही चर्चा केली होती. त्याचा अहवाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. त्यानंतर पक्षाने भिमाले यांची नियुक्ती सोमवारी जाहीर केली. भाजपच्या पक्षकार्यालयात गोगावले यांनी भिमाले यांना गटनेतेपदाचे पत्र दिले. या प्रसंगी मुरली मोहोळ, प्रवीण चोरबेले, अविनाश शिळीमकर, राजेश येनपुरे, पिंटू धावडे, महेश वाबळे आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी भिमाले म्हणाले, ""भाजपला पुणेकरांनी शतप्रतिशत साथ दिली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाने जाहीरनामा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य राहील. जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठी दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल. महापालिकेत पक्षाचा कारभार पारदर्शक ठेवण्यात येईल.'' गटनेतेपद हे आयुष्यातील सर्वात मोठे पद असून, ही संधी मिळाल्याबद्दल भिमाले यांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री, शहराध्यक्ष, दोन्ही खासदार आणि शहरातील आठही आमदारांचे आभार मानले. भिमाले हे सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर प्रभाग क्रमांक 28 मधून निवडून आले आहेत. या प्रभागात भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. भिमाले हे महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. 

टिळक, कांबळे, मोहोळ यांना संधी? 
महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे उमेदवार बुधवारी जाहीर होतील, असे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. महापौरपदासाठी मुक्ता टिळक आणि उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचे नवनाथ कांबळे यांची; तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मुरली मोहोळ यांची नियुक्ती होण्याची शक्‍यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली.

Web Title: Shrinath Bhimale leader