शुक्रवार पेठेत भीषण आग; एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

पुणे - शुक्रवार पेठेतील जुन्या तीनमजली इमारतीला बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण इमारत खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविताना धग लागून शेजारच्या इमारतींची भिंत कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला; तर अग्निशामक दलाचे चार जवान जखमी झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. 

प्रवीण द्वारकादास बन्सल (वय 42, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे मृताचे नाव आहे; तर अग्निशामक दलाचे जवान सचिन बाबू जवंजाळे (वय 36), नीलेश विठ्ठल कर्णे (वय 33), जितेंद्र रमेश सपाटे (वय 30) आणि महेश तुकाराम गारगोटे (वय 42) हे चार जण जखमी झाले आहेत. 

पुणे - शुक्रवार पेठेतील जुन्या तीनमजली इमारतीला बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण इमारत खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविताना धग लागून शेजारच्या इमारतींची भिंत कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला; तर अग्निशामक दलाचे चार जवान जखमी झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. 

प्रवीण द्वारकादास बन्सल (वय 42, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे मृताचे नाव आहे; तर अग्निशामक दलाचे जवान सचिन बाबू जवंजाळे (वय 36), नीलेश विठ्ठल कर्णे (वय 33), जितेंद्र रमेश सपाटे (वय 30) आणि महेश तुकाराम गारगोटे (वय 42) हे चार जण जखमी झाले आहेत. 

शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळ हरिहर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची तीनमजली लाकडी इमारत आहे. यामध्ये कोणी राहत नव्हते. तेथे सुरेंद्रकुमार जगन्नाथ बन्सल (रा. बिबवेवाडी) यांचे अग्रवाल अँड कंपनी आणि राकेश श्रद्धानंद अग्रवाल (रा. भवानी पेठ) यांचे आर. बी. अग्रवाल अशी हाउसकिपिंगची साहित्य पुरवठा करणारी दुकाने आहेत. बुधवारी पहाटे या दुकानांना आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी ही बाब अग्निशामक केंद्राला कळविली. त्यानंतर मध्यवर्ती अग्निशामक केंद्राच्या जवानांनी आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे मध्यवर्ती केंद्रासह नायडू, कसबा, एरंडवणा, कोंढवा खुर्द, औंध, येरवडा, कोथरूड, कात्रज आणि पुणे कॅंटोन्मेंट अग्निशामक केंद्राचे 13 बंब आणि 50 जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक केंद्राचे विभागीय अधिकारी सुनील गिलबिले, सहायक अधिकारी दत्तात्रेय नागलकर, रमेश गांगड, गजानन पाथरूडकर, संजय रामटेके यांच्यासह जवानांनी प्रयत्न करून दोन तासांत आग आटोक्‍यात आणली. 

या आगीत फिनेल, काथ्या, सुतळी, कापूस, पायपुसणी आदी साहित्य खाक झाले. पहाटे पाचच्या सुमारास तेथील साहित्य काढण्याचे काम सुरू होते. त्या वेळी आगीची धग लागून शेजारच्या इमारतीची भिंत कोसळली. त्यात अग्निशामक दलाचे जवान सचिन जवंजाळे, नीलेश कर्णे, जितेंद्र सपाटे, महेश गारगोटे आणि दुकानाचे मालक सुरेंद्रकुमार बन्सल यांचा पुतण्या प्रवीण जखमी झाले. त्यांना केईएम आणि सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; परंतु प्रवीण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

भीती, धावपळ अन्‌ गोंधळ 
शुक्रवार पेठ परिसरात दुकाने आणि दाट नागरी वस्ती आहे. या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर बाजूच्या इमारतींमध्येही आग पसरण्याची शक्‍यता होती. त्यामुळे रहिवाशांनी मुलांसह सुरक्षितस्थळी धाव घेतली. अग्रवाल अँड सन्स दुकानात फटाके ठेवण्यात येत असल्याचे समजते. त्याच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीती, धावपळ आणि गोंधळाचे वातावरण होते. मात्र, या दुकानात फिनेलसाठी लागणाऱ्या ऍसिडच्या बाटल्याही होत्या. त्याचा फटाक्‍यांसारखा आवाज येत असल्याचे सांगण्यात आले. 

नागरिकांचे ऐकले नाही 
आगीचे वृत्त समजताच प्रवीण बन्सल यांनी येरवडा येथून घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी आग आटोक्‍यात आली होती. अग्निशामक दलाचे जवान दुकानातून जळालेले साहित्य बाहेर काढत होते. त्या वेळी प्रवीण यांना नागरिकांनी आतमध्ये न जाण्याचा सल्ला दिला; परंतु दोन मिनिटांत येतो, असे सांगून ते आत गेले. त्यानंतर काही क्षणातच शेजारच्या इमारतीची भिंत कोसळली. तिच्या ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

इमारतींच्या भिंती धोकादायक 
जळीत इमारतीजवळील इमारतींच्या भिंतींना आगीची झळ बसल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. तेथे कधीही दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून या इमारती पाडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Shukrawar peth fire