प्लॅस्टिक कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा बंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

पुणे : प्लॅस्टिक बंदीला आमचा विरोध नाही; परंतु ज्या पद्धतीने कारवाई केली जात आहे, ती चुकीची आहे, असा आरोप व्यापारी करू लागले आहेत. महापालिकेने सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईच्या विरोधात सिंहगड रस्ता भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला. 

पुणे : प्लॅस्टिक बंदीला आमचा विरोध नाही; परंतु ज्या पद्धतीने कारवाई केली जात आहे, ती चुकीची आहे, असा आरोप व्यापारी करू लागले आहेत. महापालिकेने सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईच्या विरोधात सिंहगड रस्ता भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला. 

महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांकडून शनिवारपासून कारवाई सुरू झाली. व्यापाऱ्यांमधून या कारवाईविषयी नाराजी व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांच्या संघटनांनी प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीचे समर्थन केले आहे. काही उत्पादने प्लॅस्टिकच्या वेस्टनात पॅकिंग करून येत आहेत. त्यात आमचा दोष काय, असा मुद्दा व्यापारी उपस्थित करीत आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि व्यापारी यांच्यात वादाचे प्रकारही घडले. आम्ही कारवाई करणार आहोत, तुम्हाला दंड भरावाच लागेल, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. आम्ही न्यायालयात बाजू मांडून दंड भरू, असे व्यापारी सांगत होते.

महापालिकेच्या कारवाईच्या विरोधात सिंहगड रस्ता भागातील काही व्यापाऱ्यांनी दुपारनंतर दुकाने बंद केली. या कारवाईच्या विरोधात भूमिका ठरविण्यासाठी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे म्हणाले, ""महापालिका चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत आहेत. आमचा काही दोष नाही. आम्हीदेखील राज्य सरकारच्या निर्णयासोबत आहोत. ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांची चूक नाही, अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये. आमच्या संघटनेनेही प्लॅस्टिकचा कचरा गोळा केला. कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत.'' 

आम्ही बंदीच्या निर्णयाविरोधात नाही; परंतु कारवाई करताना वस्तुस्थिती पाहून केली जावी. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे उत्पादनच होऊ नये, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. 
महेंद्र पितळीया, सरचिटणीस, पुणे व्यापारी महासंघ 
 

Web Title: Shutdown of businessmen protesting against plastic action