नियम मोडल्यास परवाना जप्त

पांडुरंग सरोदे
रविवार, 8 एप्रिल 2018

पुणे - सिग्नल वा वाहतुकीचे नियम मोडण्यात फुशारकी मारत असाल किंवा नियम मोडल्याने आपण अपेक्षित ठिकाणी लवकर पोचू, असा समज असेल, तर यापुढे तो दूर केलेलाच बरा. कारण यापुढे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना केवळ दंडच होणार नाही, तर वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवानेही जप्त होणार आहेत. अशाच नियम मोडणाऱ्या तब्बल साडेसहा हजार वाहनचालकांचे परवाने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहेत. 

पुणे - सिग्नल वा वाहतुकीचे नियम मोडण्यात फुशारकी मारत असाल किंवा नियम मोडल्याने आपण अपेक्षित ठिकाणी लवकर पोचू, असा समज असेल, तर यापुढे तो दूर केलेलाच बरा. कारण यापुढे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना केवळ दंडच होणार नाही, तर वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवानेही जप्त होणार आहेत. अशाच नियम मोडणाऱ्या तब्बल साडेसहा हजार वाहनचालकांचे परवाने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहेत. 

वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे व सातत्याने नियम मोडणाऱ्यांना जरब बसावी, यासाठी पोलिसांनी मागील वर्षीपासून सातत्याने नियम मोडणाऱ्यांचे परवाने जप्त करण्यावर अधिक भर दिला आहे. नियमांचे उल्लंघन करायचे आणि दंडाची रक्कम भरून निघून जायचे, ही मानसिकता वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ही मानसिकता बदलावी आणि भविष्यात त्यांनी नियमांच्या उल्लंघनाची चूक करू नये, यासाठी परवाने जप्त करून ते निलंबनासाठी पाठविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्यांपाठोपाठ मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या आणि रिक्षा भाडे नाकारणाऱ्यांचे परवाने मोठ्या संख्येने जप्त करण्यात आले आहेत.  

प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) हे परवाने माघारी (रिव्होक) घ्यावेत, यासाठी वाहतूक शाखेने सर्व परवाने त्यांच्याकडे पाठविले आहेत. त्यामुळे आता यापुढे आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी वाहनचालकांना घ्यावी लागणार आहे.

चालक परवाने जप्त करण्यामागील कारणे 
 वाहतुकीच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणे
 भरधाव वाहन चालविणे 
 मद्यपान करून वाहन चालविणे 
 रिक्षा भाडे नाकारणे 
 वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे
 ‘ट्रिपल सीट’ वाहन चालविणे

वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे आणि सातत्याने उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने आम्ही जप्त केले आहेत. सर्व चालक परवाने निलंबनासाठी ‘आरटीओ’कडे पाठविण्यात आले आहेत. वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी शिस्त निर्माण व्हावी, हेच या कारवाईचे कारण आहे. नियमांचे प्रामाणिकपणे पालन करणाऱ्या वाहनचालकांच्या सेवेसाठी पोलिस तत्पर आहेत. 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे अयोग्य आहे. पोलिसांशी वाद घालू नयेत, तुम्ही नियम मोडता ते सीसीटीव्हीमध्ये कैद होते. दंडाची रक्कम ऑनलाइन भरता येते म्हणजेच पोलिसांचे काम पारदर्शी होऊ लागले आहे. माझ्याकडून एकदा नियम मोडला गेला, त्याचा दंडही भरला. त्यानंतर मी पुन्हा नियम मोडला नाही. मात्र, वारंवार नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे.
- अनुप जोशी, वाहनचालक

Web Title: signal transport traffic rule license seized crime