esakal | पुणे : पुनर्विकासासाठी मृत्यूनंतर येऊन स्वाक्षरी आणि अंगठ्याचा दिला ठसा

बोलून बातमी शोधा

Slum

पुणे : पुनर्विकासासाठी मृत्यूनंतर येऊन स्वाक्षरी आणि अंगठ्याचा दिला ठसा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - झोपडपट्टीचा पुनर्विकास झाला पाहिजे, याची तळमळ किती असून शकते? सहकारी सोसायटी स्थापन करून त्या माध्यमातून पुनर्विकास करण्यासाठी त्याच झोपडपट्टीतील दहा जणांनी मृत्यूनंतर येऊन स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा दिला असल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, सोसायटी सभासदत्वाचेदेखील पैसे भरले असल्याचे समोर आले आहे.

सोसायटी होणार, झोपडपट्टीचा पुनर्विकास होणार, या स्वप्नात हरवून गेलेल्या आठ ते दहा जणांना त्यांच्या नावाचा विसर पडल्याने त्यांनी दुसऱ्याच्या नावाने स्वाक्षरी केली आहे. या सर्व गोष्टी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) निदर्शनास आल्यानंतरही त्यांनी उदार भावनेने पुनर्वसनाचे काम एका बांधकाम व्यावसायिकाला दिले आहे. पुनर्विकासाच्या तळमळीने अनेक गमती-जमती सर्व्हे नंबर १८० घोरपडी पेठ येथील झोपडपट्टीत घडल्या असल्याची माहिती ‘सकाळ’च्या हाती आली आहे.

हेही वाचा: पुणे : रुग्णांना मोठा दिलासा; अखेर शहराला मिळाले ५,९०० रेमडेसिव्हीर

कोणतीही कारवाई केली नाही

या झोपडपट्टीतील काही नागरिकांनी ‘एसआरए’ प्राधिकरणाकडे हा सर्व प्रकार लक्षात आणून देऊन सहकारी सोसायटी रद्द करण्याची मागणी केली. प्राधिकरणाने त्यावर सुनावणी घेतल्यानंतर नागरिकांची तक्रारीत तथ्य असल्याचे कबूलदेखील केले. परंतु झोपडपट्टीचा पुनर्विकास झाला पाहिजे, असा हेतू ठेवून कोणतीही कारवाई केली नाही, असे ॲड. भारत पाचारणे आणि विशाल मोहिते यांनी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्विकासासाठी सोसायटी स्थापन करणे बंधनकारकच आहे असे नाही. सत्तर टक्के लोकांची परवानगी असेल, तर सोसायटी स्थापन केली अथवा नसली केली, तरी फरक पडत नाही. मात्र, झोपडीधारकांच्या संमतीपत्रात गडबड असेल, तर त्यांची तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

हेही वाचा: विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची प्रतीक्षा!

काय आहे प्रकरण?

  • स्वारगेटजवळील या झोपडपट्टीत सुमारे ११५ हून अधिक झोपड्या

  • ‘एसआरए’च्या नियमानुसार झोपडीधारकांनी एकत्र येऊन सोसायटी स्थापन केली

  • त्या सोसायटीच्या माध्यमातून पुनर्वसनासाठी बांधकाम व्यावसायिक निवडण्याची संधी दिली जाते

  • तरतुदीचा फायदा घेत झोपडपट्टीतील रहिवाशांनी २०१८ मध्ये सहकारी सोसायटी स्थापन केली

  • या सोसायटीच्या सभासदांची यादी पाहिल्यानंतर २०१८ पूर्वी मरण पावलेले दहा जण सभासद असल्याचे दिसून आले आहे

  • काही सभासदांनी आपल्या नावापुढे भलत्याच नावे स्वाक्षरी केली असल्याचे समोर आले आहे

अशी केली गडबड

  • पुनर्वसन घोरपडे पेठ येथील झोपडपट्टीचे करावयाचे असताना त्यांचा पत्ता मात्र लोहियानगर दाखविला

  • कोऱ्या हमीपत्र आणि प्रतिज्ञापत्रावर झोपडीधारकांकडून स्वाक्षरी घेण्यात आल्या आहेत.

  • मर्जीतील बांधकाम व्यावसायिकाला हे काम देण्यासाठी खटाटोप

  • यासाठी अशा प्रकारे अनेक उलट-सुलट प्रकार करून सहकारी संस्था स्थापन करण्यात आली