‘ॲक्ट ईस्ट- ॲक्ट फास्ट’चा सरकारचा निर्धार

‘ॲक्ट ईस्ट- ॲक्ट फास्ट’चा सरकारचा निर्धार
Published on

गंगटोक, ता. २८ (पीटीआय) : ‘‘आमचे सरकार केवळ ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणासाठीच कटिबद्ध नाही, तर ईशान्येकडील आठ राज्यांबाबत ‘अ‍ॅक्ट फास्ट’ धोरण राबविण्याचाही सरकारचा निर्धार आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. सिक्कीमच्या ५० व्या राज्यदिनानिमित्त गंगटोक येथील पालजोर स्टेडियममध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील राज्यांना भारताची ‘अष्टलक्ष्मी’ असे संबोधले.
सिक्कीमच्या अर्थव्यवस्थेचा कणा पर्यटन असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याअनुषंगाने राज्यातील दळणवळण व्यवस्था वाढवण्यावर सरकारचा भर असून त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राज्यात रोप-वे आणि स्काय-वे प्रकल्पही प्रस्तावित असून, पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी नाथू-ला येथे द्रुतगती मार्ग उभारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जैवविविधतेचा उल्लेख
सिक्कीममधील जैवविविधतेचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “सिक्कीममध्ये निसर्ग आणि संस्कृती यांची चैतन्यमयता अनुभवता येते. येथील रस्त्यांची स्वच्छता आणि हवेतली शुद्धता ही, -येथील लोक निसर्गसंवर्धनाचे खरे सदिच्छा दूत असल्याचे द्योतक आहे.’’

पंतप्रधान मोदी म्हणाले
-इको-वेलनेस पर्यटनासाठी सिक्कीममध्ये मोठी क्षमता
- देशाला धर्म आणि राजकीय निष्ठांच्या आधारावर विभागण्याचे प्रयत्न होत असताना, सिक्कीम ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे प्रतिबिंब
-सिक्कीम म्हणजे पूर्वेकडील स्वर्ग
-सिक्कीममध्ये क्रीडा पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि विशेषतः फुटबॉल व तिरंदाजीतील कौशल्य विकसित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे
- काँग्रेसने सिक्कीमच्या विकास प्रकल्पांना दीर्घकाळ दुय्यम स्थान दिले

Marathi News Esakal
www.esakal.com