बारामतीकरांना मोठा दिलासा, रुग्णांसाठी ऑक्सिजनची मुबलक सुविधा

मिलिंद संगई
Saturday, 29 August 2020

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, येथे 100 खाटांची क्षमता आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना अनेकदा ऑक्सिजनची गरज लागते, अशा वेळेस बारामतीतील खाटांची क्षमता कमी पडू लागली होती.

बारामती (पुणे) : बारामतीतील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी असून, येत्या आठवड्याभरात बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील 100 बेडना ऑक्सिजनची सुविधा सुरु होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई व उपविभागीय अभियंता विश्वास ओहोळ यांनी ही माहिती दिली. 

पुण्यात आज पावसाचा इशारा

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, येथे 100 खाटांची क्षमता आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना अनेकदा ऑक्सिजनची गरज लागते, अशा वेळेस बारामतीतील खाटांची क्षमता कमी पडू लागली होती. ही बाब विचारात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयास ऑक्सिजन सुविधा निर्माण करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. 

पुरंदर विमानतळाच्या निर्णयाच्या टेकआॅफविनाच बैठक

आज 56 बेडच्या ऑक्सिजन युनिट बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, येत्या आठवडाभरात उर्वरित सर्व बेडसचे काम पूर्ण होईल. यामध्ये 80 बेड साधारण रुग्णांसाठी असून, 20 बेड अतिदक्षता विभागातील आहेत. अतिदक्षता विभागात ऑक्सिजनसह व्हॅक्यूम व निगेटीव्ह प्रेशरचीही सुविधा निर्माण होत आहे. त्याचा फायदा रुग्णांना होईल. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या ऑक्सिजन युनिटसाठी रुग्णालयाच्या मागील बाजूस सहा हजार लिटर क्षमतेची एक ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा होत राहणार आहे. कोरोनाची गंभीर स्थिती पाहता विक्रमी वेळेत हे काम पूर्ण होणार असून, लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन रुग्णांना याचा फायदा व्हावा, असा प्रयत्न असल्याचे बारभाई व ओहोळ यांनी सांगितले. 

रुग्णालयासाठी जनरेटरही
या रुग्णालयाच्या कामकाजात वीजपुरवठ्याअभावी कोणताही अडथळा येऊ नये, या साठी 80 केव्हीए क्षमतेचा एक अत्याधुनिक जनरेटर सेटही बसविण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयाला वीजपुरवठा नसतानाही शस्त्रक्रिया किंवा इतर वेळेसही अडथळा येणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silver Jubilee Hospital at Baramati has 100 beds of oxygen