पाकिस्तानी होने का धब्बा चुभता था 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

पिंपरी : "पहिले हमे पाकिस्तानी, आतंकवादी की तरह देखा जाता था...हमें पाकिस्तानी होने का धब्बा चुभता था. लेकिन अब, हमारा पुनर्जन्म हो गया हैं. हम पुरी दुनिया में सर उठा के घुम सकतें हैं. हम भारतीय हैं... इसका हमें गर्व हैं,'' अशा शब्दांत सिंधी समाजातील नवभारतीय नागरिक महेशकुमार पंजवानी यांनी भावना व्यक्त केल्या. 

पिंपरी : "पहिले हमे पाकिस्तानी, आतंकवादी की तरह देखा जाता था...हमें पाकिस्तानी होने का धब्बा चुभता था. लेकिन अब, हमारा पुनर्जन्म हो गया हैं. हम पुरी दुनिया में सर उठा के घुम सकतें हैं. हम भारतीय हैं... इसका हमें गर्व हैं,'' अशा शब्दांत सिंधी समाजातील नवभारतीय नागरिक महेशकुमार पंजवानी यांनी भावना व्यक्त केल्या. 

देशाच्या फाळणीच्या वेळी 1948 मध्ये पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील उभावडो, डेहेरकी, मिरपूर भागातील सिंधी समाजाची लाखो कुटुंबे भारतात विस्थापित म्हणून दाखल झाली. दिल्ली, मुंबईमार्गे अनेक कुटुंबे राज्यातील पिंपरी कॅम्पसह उल्हासनगर, जळगाव, अकोला, अमरावती, कल्याण भागात स्थायिक झाली. त्यांच्या काही पिढ्या येथे संपल्या. परंतु, त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यातील 25 निर्वासितांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यानिमित्त "सकाळ'शी बोलताना पंजवानी यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. 

ते म्हणाले, "देशाची फाळणी झाल्यापासून 1947 ते 78 पर्यंत सिंधी समाजातील नागरिकांना भारतीय परमिट मिळत असे. परंतु, त्यानंतर कायदे बदलत गेले. पाकपुरस्कृत दहशतवादामुळे कायदे आणखी कडक होत गेले. त्यामध्ये अनेक कुटुंबे भरडली गेली. दिल्ली, मुंबई येथे वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागत असे. त्यामुळे नागरिकत्वाची आशा सोडून दिली. मात्र, आता ऑनलाइन प्रक्रियेमुळे नागरिकत्वाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माझे आई-वडील आणि 12 वर्षीय मुलाला अजून नागरिकत्व मिळालेले नाही. आई-वडिलांच्या नागरिकत्वाची प्रक्रिया सुरू आहे. मुलाचा जन्म येथेच झाला. त्याला अजून नागरिकत्व मिळायचे आहे.'' 

पूज्य उभाऊरो पंचायतीचे जिल्हाध्यक्ष जगदीश वासवानी, सहसचिव विजय कोटवानी म्हणाले, "पाकिस्तानमधून पिंपरी कॅम्प येथे सुरवातीला 50 कुटुंबे दाखल झाली होती. त्यांची सैन्याच्या बराकीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अलीकडेच त्यातील काही कुटुंबांना जागेच्या सनदाही मिळाल्या. मात्र, 15 ते 20 वर्षांपासून अनेक कुटुंबांना नागरिकत्व मिळालेले नाही. त्यासाठी संघटनेकडून पाठपुरावा केला जात आहे. एक हजार नागरिकांपैकी सुमारे 600 नागरिकांनी त्यासाठी अर्ज केला आहे.'' 
 
सिंधी समाज पाकिस्तानात असुरक्षित 
"मी 1980 मध्ये पाकिस्तानातील माझ्या गावी गेलो होतो. आमचे आजही तिथे नातेवाईक राहत आहेत. पुरुषांचे खंडणीसाठी अपहरण होत असे. आजही तेथे पुरुष सुरक्षित नाहीत. महिलांच्या परिस्थितीबद्दल कल्पनाच न केलेली बरी,'' असे मत विजय कोटवानी यांनी व्यक्त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhi people finally got recognition for Indianism