
अजून खूप काही करायंच आहे : पद्मविभूषण प्रभा अत्रे
पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कार्थींची नावं जाहीर झाली आहेत. यामध्ये किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ.प्रभा अत्रे (Dr.Prabha Atre) यांना पद्मविभुषण पुरस्कार जाहिर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व, उत्तम गायिका आणि लेखिका तसेच कवयित्री म्हणून ओळख असलेल्या डॉ. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आहेत. डॉ. अत्रे यांनी सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई एसएनडीटी महाविद्यालयात काही काळ त्यांनी संगीत प्राध्यापिका म्हणूनही काम केले. ‘सुस्वराली’ या बंदीशींवर आधारित तीन खंडांचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. सवाई गंधर्व - भीमसेन महोत्सवाची २००६ पासून त्यांच्या गायनाने सांगता होते.
अजून खूप काही करायंच आहे - डॉ. प्रभा अत्रे
''माझे वय आता ९० आहे. हा एवढा मोठा सन्मान मला मिळेल, असे अपेक्षित नव्हते. पण हा सन्मान योग्य वेळी मिळाला, हे माझे नशीब आहे. कलेच्या क्षेत्रातील माझ्या ६० वर्षांच्या सेवेचे हे फळ आहे, असे म्हणता येईल. यामुळे माझ्यापेक्षा माझ्या शिष्या, शिष्य, गुरुजन, माझ्यावर प्रेम करणारे रसिक श्रोते, समीक्षक यांना जास्त आनंद झाला आहे.'' असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा: असे आहेत २०२२ च्या पद्म पुरस्कारांचे मानकरी; वाचा सविस्तर
देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सर्वौच्च सन्मानाने गौरवण्यात येते. या पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केलेली आहे. यामध्ये जेष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ''पुण्यात माझा जन्म झाला, शिक्षण पुण्यात झाले. पुण्याने मला खूप काही दिले आहे. त्यामुळे या शहराचा मला अभिमान आहे. माझ्या कलेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले आहे. त्याचे मला समाधान आहे. हा सन्मान मिळाला असला तरी माझी कलेची साधना सुरूच राहणार आहे. त्यात अजून खूप काही करायचे आहे. एका शाळेच्या माध्यमातून सामाजिक काम करीत आहे. ते पुढेही सुरूच ठेवणार आहे.'' असे त्या म्हणाल्या.
Web Title: Singer Prabha Atre Padmavibhushan Award Announced
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..