सिंहगड घाटरस्ता तीन महिने बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

खडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

खडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सिंहगडावरील वाहनतळापासून पुण्याकडे येणारा दोन किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाला होता. परिणामी पर्यटकांच्या संख्येत देखील काही प्रमाणात घट झाली होती. आमदार भीमराव तापकीर यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यामार्फत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार 2017- 18च्या अंदाजपत्रकात त्यासाठी निधी उपलब्ध झाला होता. 

दरम्यान, पावसाळ्यात पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यामुळे, डिसेंबरपर्यंत काम करू नये, अशी मागणी या गडावरील वाहन चालक, हॉटेल व्यावसायिकांसह विक्रेत्यांची आणि पर्यटकांची होती. सध्या गर्दी थोडी कमी झाली आहे. त्यानुसार आता या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये, वाहनतळाजवळील रस्ता कॉंक्रीटचा करणार असून कोंढणपूर फाटा ते तळई उद्यान पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण होणार आहे. कॉंक्रीट रस्ता करताना बेसकोर्स (कोबा) असेल त्यावर, मुख्य कॉंक्रीट म्हणजे पिक्‍युसी करण्यात येईल. ही पिक्‍युसीची उंची सुमारे एक फूट असणार आहे. घाट रस्ता हा शेवटच्या टप्प्यातील असल्यामुळे या ठिकाणी पावसाचे पाणी बाहेर काढले जाणार आहे. यापूर्वी झालेल्या डांबरीकरणाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्याची देखील डागडुजी करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी दिली. 

घाट रस्त्याची एकूण लांबी - 9 कि.मी. 
नव्याने कॉंक्रीटीकरण होणारा रस्ता -2 कि.मी. 
नव्याने डांबरीकरण, रुंदीकरण होणारा रस्ता - 2 कि.मी. 
रस्त्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम - 5 कोटी रुपये 
रस्त्याच्या कामामुळे रस्ता बंद - 3 महिने 

 

Web Title: Sinhagad Ghat Road closed for three months