Pune News : अखेर सिंहगड रस्त्याचे गोऱ्हे बुद्रुक येथील वर्षभरापासून रखडलेले काम पुन्हा सुरू

नागरिकांच्या संतापानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल
Sinhagad Gorhe Budruk Road work has resumed Public works department pune
Sinhagad Gorhe Budruk Road work has resumed Public works department punesakal

सिंहगड: गोऱ्हे बुद्रुक गावातील तब्बल वर्षभरापासून रखडलेले सिंहगड रस्त्याचे काम अखेर पुन्हा सुरू झाले आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने धुळ, खड्डे, वाहतूक कोंडी व अपघातांनी हैराण झालेल्या स्थानिक रहिवासी, परिसरातील गावांतील नागरिक व पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मागील दोन दिवसांपासून ठेकेदाराने काम सुरू केल्याने अर्ज, विनंती व आंदोलन करुन वैतागून गेलेले नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

गोऱ्हे बुद्रुक येथील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुमारे वर्षभरापूर्वी रस्त्याच्या कडेने असलेले काही रहिवासी व डीआयएटी प्रशासन यांच्या विरोधामुळे थांबले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने कशीबशी या संबंधीतांची समजूत घातली व काम सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला.

ठेकेदार काम करत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाला होता तर दुसऱ्या बाजूला स्थानिक रहिवासी रस्त्याचे काम तातडीने करुन घ्यावे या मागणीसाठी आक्रमक झाले होते.

संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केल्यानंतर लवकरच काम सुरू केले जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. अखेर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक रहिवासी, आजूबाजूच्या गावांतील नागरिक व सिंहगड, पानशेत या भागात येणारे पर्यटक, दुर्गप्रेमी समाधान व्यक्त करत आहेत.

लोकप्रतिनिधींचाही संताप....... सिंहगड रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे स्थानिकांसह पर्यटकांची गैरसोय होत असल्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात संताप व्यक्त करत तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली होती.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही सातत्याने पत्रव्यवहार करत व सोशल मीडियाच्या माध्यमातून रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. काही दिवसांपूर्वी आमदार भीमराव तापकीर यांनीही गोऱ्हे बुद्रुक येथील रखडलेल्या कामाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम पूर्ण करुन घेण्यास सांगितले होते.

-"रस्त्याचे काम रखडल्याने खुप मनःस्ताप सहन करावा लागला. आंदोलन करुन महिना उलटला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्याने अखेर काम सुरू झाले आहे."

-सचिन पासलकर, माजी सरपंच, गोऱ्हे बुद्रुक

"अगोदर डीआयएटीचा विरोध, त्यानंतर ग्रामस्थांचा विरोध अशी कारणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देत होते. त्यानंतर ठेकेदार काम करत नसल्याचे सांगून अधिकारी वेळ मारुन नेत होते. पर्यायी रस्ता नसल्याने स्थानिक रहिवासी, परिसरातील गावांतील नागरिक व पर्यटक या रखडलेल्या कामामुळे हैराण झाले होते. काम सुरू झाल्याने सर्वांची सुटका होणार आहे मात्र आता काम थांबू नये ही अपेक्षा."

-सुशांत खिरीड, ग्रामपंचायत सदस्य, गोऱ्हे बुद्रुक.

"गोऱ्हे बुद्रुक येथील रखडलेले काम संबंधित ठेकेदाराला सांगून सुरू करुन घेतले आहे. आता काम थांबणार नाही. थोडेच काम बाकी असल्याने येत्या काही दिवसांत येथील काम पूर्ण होईल."

-बाप्पा बहीर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com