नवजात बालकाचा जन्मदात्यांनीच केला खून; सिंहगड पोलिसांनी जोडप्याला केली अटक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

कुंवरसिंग आणि त्याच्या पत्नीचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही हेल्पर म्हणून एका कंपनीमध्ये कामाला होते. मात्र लॉकडाऊनमध्ये दोघांचीही नोकरी गेली होती.

पुणे : नवजात बालकाचा खून करून त्याचा मृतदेह नष्ट करणाऱ्या आई-वडिलांना सिंहगड पोलिसांनी गुरुवारी (ता.15) अटक केली. संबंधित घटना सोमवारी (ता.12) रात्री साडे आठ वाजता वडगाव बुद्रुक परिसरात घडली होती. 

कुंवरसिंग सुभाष ठाकूर (वय 34, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रूक) याच्यासह त्याच्या 21 वर्षीय पत्नीला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी फिर्याद दिली आहे.

Video : 'अहो सुप्रियाताई, महापालिकेत तुमचीच सत्ता होती!'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंवरसिंग आणि त्याच्या पत्नीचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही हेल्पर म्हणून एका कंपनीमध्ये कामाला होते. मात्र लॉकडाऊनमध्ये दोघांचीही नोकरी गेली होती. त्यानंतर दोघांच्याही हाताला काम नव्हते. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी महिलेने ससून रुग्णालयामध्ये एका बालकाला जन्म दिला. मात्र, नवजात बालक हे दिव्यांग असल्याचे डॉक्‍टरांनी त्यांना सांगितले होते. या घटनेनंतर महिलेने बालकास अनाथाश्रमात ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर सोमवारी महिलेने बाळाचे नाक आणि तोंड स्कार्फने दाबून त्याला जीवे मारले. त्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बालकाचा मृतदेह वडगाव बुद्रुक येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील जंगलात खड्ड्यात पुरले. या घटनेची पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी ठाकूर आणि त्याच्या पत्नीने हा प्रकार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.बी.कणसे करीत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinhagad police arrested the parents who killed a newborn baby and destroyed his body