esakal | हवेली ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचे फूटपाथवर 'अतिक्रमण'
sakal

बोलून बातमी शोधा

pune

हवेली ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचे फूटपाथवर 'अतिक्रमण'

sakal_logo
By
विठ्ठल तांबे

धायरी : पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलिस स्टेशन तर्फे जप्त करण्यात आलेली चारचाकी, अवजड व सुमारे दोनशे दुचाकी वाहने दीर्घकाळ सिंहगड रस्त्यावरील अभिरुची माॅलजवळच्या फूटपाथवर अतिक्रमण केलेल्या अवस्थेत आहेत. नागरिकांना आता या वाहनांच्या अडथळ्याचा त्रास होत आहे. हवेली पोलीस ठाण्याची हद्द पुणे शहरापासून टप्प्या टप्प्याने दूर होत गेली. तथापि, मुख्य पोलीस ठाणे पुणे शहरातील मामलेदार कचेरीत तर सिंहगड रोड परिसरासाठी असलेली पोलीस चौकी अभिरुची माॅलजवळ असून अभिरुची चौकी म्हणून प्रसिद्ध आहे.

अपघात, चोरी, बिनधनी वाहने आदी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनांची दाटी हवेली पोलीस स्टेशन जवळील फूटपाथवर आणि रस्त्यावर झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही वाहने धूळ खात जागीच असून पावसामुळे भंगारजमा होऊ लागली आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर जप्त वाहने मालकांना परत करण्याचा किंवा बिनधनी वाहनांचा लिलाव करण्याचा अधिकार पोलिसांना मिळतो. ही प्रक्रिया दीर्घकालीन असू शकते. त्यातच चोरीस गेलेल्या वाहनाबाबत फिर्यादी करण्याचेही टाळले जात असल्याने बिनधनी वाहने वर्षानुवर्षे सांभाळत राहण्याचे सोपस्कार पाळताना बहुतांश पोलीस ठाण्यांना जिकिरीचे जाते. शहर हद्दीसह शहरालगतच्या ग्रामीण हद्दीत सुध्दा अशी वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागाच नसल्याचे गेल्या दोन दशकातील चित्र आहे.

हिच अवस्था हवेली पोलीस ठाण्याचीही आहे. अभिरुची माॅललगतच मंदिर असून फूटपाथवरची वर्दळ वाढली आहे. दीर्घकाळ फूटपाथवर असलेल्या जप्त वाहनांच्या अडथळ्याबाबत वाढत्या तक्रारी आहेत. सामान्य नागरिकांनी पदपथावर वाहने उभी केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद वाहतूक पोलीस आणि महानगर पालिका करत असते.

पोलिसांनीच या संदर्भात केलेल्या नियमभंगाबाबत कोण बोलणार अशी स्थिती असून नागरिकांना फूटपाथवरील वाहनांचा अडथळा होत असल्याने सिंहगड रोड वाहतूक विभागाने हवेली पोलीस ठाण्याशी ही वाहने हलवावीत म्हणून पत्रव्यवहार सुध्दा केला आहे, तथापि, या प्रश्नाबाबत कसलीही सकारात्मक हालचाल दिसून येत नाही. नागरिकांनचा रोष वाढताना दिसत आहे. पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत वाढ झाल्याने हवेली पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र सुध्दा आकुंचित झाले आहे. मात्र मुख्य पोलीस ठाणे आणि चौकी पुणे शहरात अशी विसंगत परिस्थिती असलेल्या हवेली पोलीस ठाण्याच्या जप्त वाहनांचे ओझे फूटपाथवर होऊ लागले आहे.

" आम्ही दरोज या फुटपाथ वरून ये-जा करत असतो परंतु अनेक वर्षांपासून हावेली पोलीस ठाण्याची जप्त केलेली वाहने रस्त्यावर व फुटपाथवर असतात त्यामुळे चालण्यास अडथळा होतो. सर्व सामान्य ची वाहने थोडा वेळ जरी रस्त्यावर,फुटपाथ किंवा नो पार्किंग झोने मध्ये उभी असल्यास तात्काळ वाहतूक पोलीस दंडात्मक किंवा वाहने जप्त करण्याची कारवाई करतात तर यावर कारवाई का होत नाही.

धनश्री पाटील-स्थनिक महिला..

हेही वाचा: लाडक्या 'आमदाराची' बांधली समाधी; मृत्यूनंतर पार पाडले सर्व धार्मिक विधी

 "बेवारस वाहनाची आम्ही यादी करत आहोत. त्यांची लिलाव करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रियासुरू असून, परवानगी मिळाल्या नंतर पुढील कार्यवाही केली जाईल.पोलीस ठाण्याच्या नवीन जागेचा शोध सुरू असून पोलीस ठाण्याच्या ताब्यातील सर्व वाहाने नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात येतील".

डॉ-सई भोरे पाटील-हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी.

या बाबत वेगळा न्याय का?

  सर्व सामान्य ची वाहने थोडा वेळ जरी रस्त्यावर,फुटपाथ किंवा नो पार्किंग झोने मध्ये उभी असल्यास तात्काळ वाहतूक पोलीस दंडात्मक किंवा वाहने जप्त करण्याची कारवाई करतात. मात्र हवेली पोलीस ठाण्याने गुन्ह्यात जप्त केलेली वाहने मुख्य सिंहगड रस्त्यावर तसेच फुटपाथवर पडून आहेत. त्याबाबत पुणे शहर पोलीस दलाच्या सिंहगड रस्ता वाहतूक विभागाकडून का कारवाई करण्यात येत नाही. हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मग येथे वेगळा न्याय का?असा प्रश्न सर्वसामान्यकडून उपस्थित करण्यात येत आहे.

loading image
go to top