Ebus | सिंहगडावरील ई- बसच्या फेऱ्या अडकल्या चर्चेच्याच गुऱ्हाळात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ebus
सिंहगडावरील ई- बसच्या फेऱ्या अडकल्या चर्चेच्याच गुऱ्हाळात!

सिंहगडावरील ई- बसच्या फेऱ्या अडकल्या चर्चेच्याच गुऱ्हाळात!

पुणे - सिंहगड किल्ल्यावर प्रवाशांना गोळेवाडीतून जाता यावे, यासाठीची ई- बस सेवा सुरू करण्याची घोषणा अजूनही महापालिका आणि वनविभागाच्या चर्चेच्या गुऱ्हाळातच अडकली आहे. सिंहगडावर पीएमपीची बससेवा सुरू झाल्यास वनविभागाला त्यातून प्रती प्रवासी उत्पन्न हवे आहे. परिणामी चर्चेच्या फेऱ्या वाढत आहेत, असे समजते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा आदींनी पीएमपीच्या ई- बसमधून १ ऑक्टोबर रोजी सिंहगडावर दौरा केला. पीएमपीच्या ताफ्यातील ई- बस सिंहगडाचा घाट प्रवासी घेऊन पार करू शकते, हे त्यावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे अल्पावधीतच गोळेवाडी ते सिंहगड किल्ला दरम्यान पीएमपीची ई बस सेवा सुरू होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी केली होती. मात्र, त्यानंतर पीएमपी आणि वनविभाग यांच्यात चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या. परंतु, बससेवा केव्हा सुरू करायची, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

हेही वाचा: बालदिनानिमित्त वसुंधरा वाहिनीवर चिमुकल्यांचा ताबा

पीएमपीच्या बससेवेमधून वनविभागाने प्रती प्रवासी उत्पन्नाची मागणी केली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून किती भाडे घ्यायचे हे अद्याप ठरलेले नाही. गोळेवाडी ते सिंहगड किल्ला दरम्यान एक बाजूच्या फेरीसाठी तेथील जीप व्यावसायिक सध्या ६० रूपये प्रती प्रवासी भाडे आकारतात. तसेच ई - बससेवा सुरू झाल्यावर सिंहगडावर खासगी वाहने बंद करायची आहेत तसेच बस थांब्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. ई-बससाठी चार्जिंग स्टेशन कोठे आणि कसे उभारायचे नाही, हेही अद्याप ठरलेले नाही. या बाबत वनविभाग आणि पीएमपीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, चर्चा सुरू आहे, निर्णय अद्याप झालेला नाही असे दोन्ही खात्यांकडून सांगण्यात आले. बससेवा केव्हा सुरू होईल, हेही त्यांना स्पष्ट करता आले नाही.

पुण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सिंहगड हे आकर्षणाचे केंद्र आहे. सिंहगड पायथ्यापर्यंत पीएमपीची बससेवा सध्या सुरू आहे. मात्र, किल्ल्यावर जाण्यासाठी बससेवा सुरू झाल्यास पर्यटकांना दिलासा मिळू शकतो. खासगी जीपचे भाडे प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळे पीएमपीची ई- बस किल्ल्यावर केव्हा जाणार, या कडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. मात्र, वनविभाग आणि पीएमपीमधील चर्चा नेमकी कशात अडकली आहे, या बाबत हे दोन्ही विभागांतील अधिकारी नेमकेपणाने सांगत नसल्यामुळे ई-बसद्वारे सिंहगड किल्ल्याची ट्रिप ही केवळ घोषणाच ठरणार, अशी चिन्हे आहेत.

loading image
go to top