सिंहगड रस्त्यावर उभारणार उड्डाण पूल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते हिंगणेदरम्यान उड्डाण पूल उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महापालिका १२५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच, पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पु. ल. देशपांडे उद्यान ते नवश्‍या मारुतीदरम्यान भुयारी मार्ग करण्याचीही प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे - वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते हिंगणेदरम्यान उड्डाण पूल उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महापालिका १२५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच, पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पु. ल. देशपांडे उद्यान ते नवश्‍या मारुतीदरम्यान भुयारी मार्ग करण्याचीही प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मिसाळ म्हणाल्या, ‘‘उड्डाण पुलासाठी सध्या ८० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. तर, पोलिस ठाण्यासाठी खासदार आणि आमदार निधीतून तरतूद करण्यात आली आहे. सनसिटी पोलिस ठाणेही अल्पावधीत होणार आहे. परिसरात भाजपचे सात नगरसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून सिंहगड रस्त्याला दोन पर्यायी रस्ते तयार करण्यात येत आहेत.’’ 

‘‘फनटाइम ते पु. ल. देशपांडेदरम्यानचा रस्ता तयार झाला आहे. तसेच, ससूनच्या धर्तीवर सिंहगड रस्त्यावर सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न असून, पु. ल. देशपांडे उद्यानातही दिल्ली हटच्या धर्तीवर कलाग्राम उभारण्यात येत आहे. नदीपात्रात रस्ता उभारताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. 

या वेळी नगरसेविका मंजूषा नागपुरे, अनिता कदम, नगरसेवक श्रीकांत जगताप, भाजपचे शहर सरचिटणीस दीपक मिसाळ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinhgad Road Over Bridge Traffic