तरुणांच्या मस्तीची ज्येष्ठ महिला बळी

संतोष शेंडकर
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

झिंगाट तरुणांच्या सुसाट चारचाकीने एका ज्येष्ठ महिलेस अक्षरशः चेंडूसारखे उडविले. लेकीला भेटायला निघालेली ही "आई' निम्म्या रस्त्यातच तरुणांच्या मस्तीची बळी ठरली. लेकीसाठी, नातवांसाठी घेतलेली भेळ, दूध, अंडी, डाळ रस्त्यावर पसरलेली पाहून पाहणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. वाघळवाडी (ता. बारामती) येथे नीरा-बारामती रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

सोमेश्वरनगर (पुणे) : झिंगाट तरुणांच्या सुसाट चारचाकीने एका ज्येष्ठ महिलेस अक्षरशः चेंडूसारखे उडविले. लेकीला भेटायला निघालेली ही "आई' निम्म्या रस्त्यातच तरुणांच्या मस्तीची बळी ठरली. लेकीसाठी, नातवांसाठी घेतलेली भेळ, दूध, अंडी, डाळ रस्त्यावर पसरलेली पाहून पाहणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. वाघळवाडी (ता. बारामती) येथे नीरा-बारामती रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
 
अंजूबाई नानासो वाघापुरे (वय 70, रा. राख, ता. पुरंदर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा चारचाकीचा चालक राहुल सुनील गायकवाड (रा. वडगाव निंबाळकर) याच्यावर दाखल झाला आहे. तो अपघातानंतर फरारी झाला आहे. याबाबत भागा आबाजी ठोंबरे (रा. मुढाळे, ता. बारामती) यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दिली आहे. वाघळवाडी येथे नीरा-बारामती रस्त्याच्या साइडपट्टीपासून दूर अंतरावर अंजूबाई वाघापुरे बसल्या होत्या. नीरेकडून प्रचंड वेगाने आलेली असेंट (क्र. एमएच 12 बीपी 7784) चारचाकी रस्त्यावरून खाली आली व वाघापुरे यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वाघापुरे आठ-दहा फूट उंच उडून खूप पुढे जाऊन पडल्या. यानंतर चारचाकी एका घरासमोरील संरक्षण भिंतीला धडकून अडकली. वाघापुरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर गर्दीच्या भयाने चालक गायकवाड फरार झाला. प्रशांत मदने, शिवदत्त सूर्यवंशी हे वडगाव निंबाळकर येथील तर अनिकेत (पूर्ण नाव माहीत नाही) हा नीरा येथील तरुण गाडीत होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinior Citezen Women Killed In Accident