आईला वाचविताना भावंडांचा मृत्यू

आईला वाचविताना भावंडांचा मृत्यू

खडकवासला - पानशेत धरण परिसरात कपडे धुण्यासाठी आईसमवेत गेलेल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी  दीडच्या सुमारास घडली. 

प्रथम ऊर्फ कुणाल दत्तात्रेय भगत (वय १७) आणि वैष्णवी दत्तात्रेय भगत (वय १४) अशी त्यांची नावे आहेत. आई सविता दत्तात्रेय भगत, मावसभाऊ व काका यांच्यासह ही भावंडे कपडे धुण्यासाठी गेली होते. सविता या कपडे धूत असताना त्यांचा पाय घसरून त्या खोल पाण्यात पडल्या. या वेळी कुणालचा मावसभाऊ त्यांना पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी पाण्याकडे गेला. त्या वेळी कुणाल व वैष्णवीही धावले. 

मावसभावाने सविता यांना पाण्याबाहेर काढले; परंतु त्याचदरम्यान कुणाल व वैष्णवीदेखील पाण्यात उतरून खोल बाजूला गेले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  ही घटना घडत असताना आरडाओरडा झाल्याने रस्त्यावरून जाणारे नागरिक व पानशेत पोलिस चौकीचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक भोई समाजाचे ईश्वर महाडिक, रमेश महाडिक, माजी सरपंच विलास तारू यांच्या मदतीने भावंडांचा पाण्यात शोध घेतला. दुपारी सव्वाचारला त्यांचे मृतदेह आढळले. ते शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुवर्णा हुलवान यांनी दिली.

आधार हरपला...
दरम्यान, कुणाल व वैष्णवी यांच्यासह त्यांची आई वडगाव बुद्रुक येथील कॉलेज रस्त्यावरील दिघे टॉवर सर्व्हे नंबर ४३ मध्ये भाड्याने घर घेऊन राहत होती. कुणाल याने बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मुंबई येथे नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता. सध्या तो वडगाव बुद्रुक येथील खासगी रुग्णालयात तीन महिन्यांपासून कामाला होता. वैष्णवी ही दांगट पाटील शाळेत नववीमध्ये शिकत होती. दोन्ही मुले गेल्याने त्यांच्या आईचा आधार हरपला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com