लागलाय शिक्षणाचा ठाव; सोसतेय नशिबाचे घाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

बिबवेवाडी - मुलीला शिकवून शिक्षिका बनविण्याचे आईचे स्वप्न...हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अनवाणी  उसाच्या रसाच्या फिरत्या गुऱ्हाळाची दांडी फिरवीत ती माय संसाराचा गाडा हाकतेय. उन्हातान्हात राबणाऱ्या या माऊलीला तिची लेकही हातभार लावतेय. 

बिबवेवाडी - मुलीला शिकवून शिक्षिका बनविण्याचे आईचे स्वप्न...हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अनवाणी  उसाच्या रसाच्या फिरत्या गुऱ्हाळाची दांडी फिरवीत ती माय संसाराचा गाडा हाकतेय. उन्हातान्हात राबणाऱ्या या माऊलीला तिची लेकही हातभार लावतेय. 

सीताबाई चोभे असे या माउलीचे नाव. त्या बिबवेवाडीत राहतात. मुलीला शिकवून तिला शिक्षिका बनवायचं, हा ध्यास उराशी बांधून त्या परिस्थितीशी दोन हात करताहेत. सध्या त्यांची मुलगी नीता आठवीत शिकत असून, शाळा सांभाळून तीही आपल्या आईला मदत करतेय.  हे कुटुंब मुळचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील. रामभाऊ चोभे पत्नी सीताबाईंसह तीन मुली व एका मुलासह दहा वर्षांपूर्वी कामाच्या निमित्त पुण्यात आले.

सुरवातीला ते शेळकेवस्तीत भाड्याच्या खोलीत राहत होते. रामभाऊ व सीतबाईंनी दहा वर्षांपूर्वी फिरत्या गुऱ्हाळाचा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच शेळकेवस्तीत दोनशे चौरस फुटांची खोली विकत घेतली. सुरवातीला सीताबाईंच्या दोन मुली शिक्षण करत गुऱ्हाळात त्यांना मदत करत होत्या; परंतु हलाखीच्या परिस्थितीमुळे मुलींना जेमतेम दहावीपर्यंतचे शिक्षणसुद्धा पूर्ण करता आले नाही. दोन्ही मुलींची लग्ने लावावी लागली. मुलाचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तोसुद्दा वडिलांना गुऱ्हाळ चालविण्यास मदत करतो.

लहान मुलगी नीता हिला शिक्षण देऊन शिक्षिका करण्याचे स्वप्न असल्याचे सीताबाई सांगतात. त्यासाठीच त्या उन्हातान्हाची तमा न बाळगता रसाचे गुऱ्हाळ चालवत आहेत. आईचे कष्ट पाहवत नसल्यामुळे नीता शाळा सुटल्यावर आईला मदत करीत आहे. 

अनवाणी पायांना फोड
रस काढताना गुऱ्हाळाची दांडी चप्पल घालून फिरवता येत नाही. चपलेमुळे दांडीला जोर लावता येत नाही. पाय घसरतो. त्यामुळे अनवाणीच दांडी फिरवावी लागते. उन्हात अनवाणी दांडी फिरवल्यामुळे अनेक वेळा पायाला फोड येतात, असे सीताबाई सांगतात अन्‌ तेही दांडी फिरवतच!

Web Title: sitabai chobhe life story