पुणे जिल्ह्यातील सहा औषधविक्रेते रडारवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री कोणाला केली, याची माहिती घेण्याचे आदेश 

पुणे - गर्भपाताच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या जिल्ह्यातील सहा औषधविक्रेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या औषधांची विक्री नेमकी कोणाला केली, याबाबतची सविस्तर माहिती घेण्याबाबतचे पत्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यातील आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे झालेल्या स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणानंतर गर्भपाताच्या औषधविक्रीची कसून तपासणीची मोहीम ‘एफडीए’ने हाती घेतली. याअंतर्गत जिल्ह्यातील गर्भपाताच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या औषध दुकानांची माहिती घेण्यात आली आहे. बारामती, दौंड आणि शिरूर येथील सहा औषधविक्रेत्यांनी एकाच वेळी ५०-५० गर्भपाताच्या गोळ्यांचे ‘किट’ खरेदी केल्याचे उघड झाले. त्यामुळे याबाबत सविस्तर तपासणीची गरज असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या डॉक्‍टरांची मदत घेण्यात येत आहे. 

‘एफडीए’चे सहायक आयुक्त एस. बी. पाटील म्हणाले, ‘‘काही औषधविक्रेत्यांनी गर्भपाताच्या गोळ्यांची प्रमाणापेक्षा जास्त खरेदी केल्याचे दिसून आले. बारामती, दौंड आणि शिरूर भागातील या औषधविक्रेत्यांनी या गोळ्या नेमक्‍या कोणाला दिल्या, याची माहिती आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी. याबाबतचे पत्र या तीनही जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे.’’

‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त विद्याधर जावडेकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील आरोग्य खात्याचे अधिकारी आणि ‘एफडीए’ अशी संयुक्त तपासणी करण्यात आलीच; पण काही दुकानांमध्ये औषध निरीक्षकांनीही तपासणी केली. १२ ठिकाणी केलेल्या तपासणीतून दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईल.’’ 

Web Title: six medicine sailer on radar