esakal | शिरूरमध्ये सोळा लाखांचा गांजा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

crime

शिरूरमध्ये सोळा लाखांचा गांजा जप्त

sakal_logo
By
नितीन बारवकर, शिरूर

शिरूर : तालुक्यातील न्हावरे-आलेगाव पागा रस्त्यावर न्हावरेपासून जवळच एका माळरानावरील झोपडीवजा पालातून सुमारे 16 लाख 38 हजार रूपये किंमतीचा तब्बल 78 किलो गांजा जप्त करण्यात आला. शिरूर पोलिसांनी काल रात्री, अंमली पदार्थाच्या विक्रीवर टाकलेल्या या धाडसी छाप्यानंतर चौघांची धरपकड करण्यात आली. सुनील रूपराव पवार (वय २०), आकाश सर्जेराव पवार (वय २०), विशाल कैलास मोहिते (वय १८) व प्रकाश सर्जेराव पवार (वय १८, सर्व रा. टाकरखेड, ता. चिखली, जि. बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, त्यांच्याविरूद्ध अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे बाळगणे आणि अवैध मार्गाने विक्री केल्याप्रकरणी 'एमपीडीए' अंतर्गत आज गुन्हा दाखल करण्यात आला. शिरूर न्यायालयाने या चौघांना तीन मे पर्यंत पोलिस कोठडी दिली.

हेही वाचा: पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ११ एप्रिलपासून ओहोटी सुरू

न्हावरे-आलेगाव पागा रस्त्यानजीक आडबाजूला असलेल्या एका माळरानातील झोपडीवजा पालातून गांजाची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे व पोलिस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर यांच्या नेतृत्वाखालील संतोष साठे, मुकूंद कुडेकर, इब्राहीम शेख, संतोष साळुंखे, प्रशांत खुटेमाटे व शितल गवळी या पोलिस पथकाने काल रात्री उशिरा न्हावरे-आलेगाव रस्त्यावर सापळा लावला. तेथून जवळच एका माळरानातील पालात संशयास्पद हालचाली जाणवल्यानंतर, पोलिसांनी वाहने दूरवर लावून संबंधित टेकडीला चोहोबाजूने घेरले. पोलिसांची चाहूल लागताच सुनिल पवार व इतरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोहोबाजूंनी घेरलेल्या पोलिस पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, नायब तहसिलदार ज्ञानदेव यादव यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या पालाची पोलिसांनी कसून झडती घेतली असता, दोन गोण्यांमध्ये खाकी कागदाचे व प्लॅस्टिकचे ३५ पुडे मिळून आले. यातील काही पुड्या पोलिसांनी उघडून पाहिल्या असता, त्यात ओलसर गांजा आढळून आला. सुमारे ७८ किलो वजनाचा हा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १६ लाख ३८ हजार रूपये इतकी होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी दिली.

हेही वाचा: जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

loading image