रस्ता ओलांडताना झाले सहा महिन्यांत सोळा अपघात...

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 15 मे 2018

मंचर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) गावाजवळ पारगाव तर्फे खेड गावाकडे जाण्यासाठी अजून बाह्यवळणाचे काम झाले नाही. त्यामुळे रानवारा ढाबा येथे रस्ता ओलांडताना गेल्या सहा महिन्यांत सोळा अपघात झाले आहेत. त्यामध्ये सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नऊ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. बाह्य वळणाचे अपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

पारगावकडे जाण्यासाठी पूल तयार झाला आहे; पण पुलाच्या पूर्व बाजूने अजून बाह्य वळणाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मंचरहून येणाऱ्या वाहनचालकांना पारगावकडे जाण्यासाठी हॉटेल गोविंदापासून रस्ता ओलांडून विरुद्ध दिशेने जावे लागते. पेठ गावाकडे जाताना पुलाच्या पश्‍चिमेला जावे लागते. त्यानंतर रानवारा ढाब्यापासून पूर्व बाजूला रस्ता ओलांडावा लागतो, अशी माहिती पारगाव तर्फे खेडचे सरपंच सचिन पानसरे व उपसरपंच शंतनू मनकर यांनी दिली.

ते म्हणाले, "बाह्यवळण न झाल्याने व अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने पारगावचे गावकरी भयभीत झाले आहेत. रविवारी (ता. 13 ) रात्री रानवारा ढाब्याजवळ मोटारीची ट्रकला मागून धडक बसून अपघात झाला. अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.''

पुणे-नाशिक चौपदरी रस्त्यावरून पारगावकडे जाण्यासाठी ताबडतोब बाह्यवळणाचे काम व्हावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. हे काम लवकर न झाल्यास पारगावच्या ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Sixteen road accidents in six months in pune nashik highway