साठ नगरसेवक भाजपच्या संपर्कात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भोसरीतील जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर आता महापालिकेतील राष्ट्रवादीच्या काही बड्या पदाधिकाऱ्यांसह आणखी 60 नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. नोटाबंदी, महामोर्चा आणि राज्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपची झालेली सरशी यामुळे येथील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. 

पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भोसरीतील जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर आता महापालिकेतील राष्ट्रवादीच्या काही बड्या पदाधिकाऱ्यांसह आणखी 60 नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. नोटाबंदी, महामोर्चा आणि राज्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपची झालेली सरशी यामुळे येथील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. 

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या "व्हिजन 2020'च्या उद्‌घाटनप्रसंगी राष्ट्रवादीच्या पाच, अपक्ष दोन व मनसे, शिवसेना प्रत्येकी एक, अशा नऊ विद्यमान नगरसेवकांसह शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. यामध्ये शांताराम भालेकर, नितीन लांडगे, श्रद्धा लांडे, शुभांगी लोंढे, नितीन काळजे, राहुल जाधव, अजय सायकर, सुरेश म्हेत्रे व अरुणा भालेकर यांचा समावेश आहे. नगरसेवकांच्या या कृतीवर सत्तारूढ पक्षाने मंगळवारी तातडीने बैठक घेऊन या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली, तर आपल्याकडे दाखल केलेले राजीनामे स्वीकारले असल्याचे महापालिकेच्या आयुक्तांनी स्पष्ट केले. या संदर्भात बोलताना काही नगरसेवकांनी कारवाईला आपण घाबरत नसल्याचे सांगितले. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी राजेंद्र जगताप, नवनाथ जगताप, शत्रुघ्न काटे या नगरसेवकांसह शिक्षण मंडळाच्या सदस्या सविता खुळे यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवून त्यांच्याविरोधात कारवाईची शिफारस राष्ट्रवादी कॉंग्रेसने विभागीय आयुक्तांकडे केली होती; पण या नगरसेवकांवर कारवाई तर दूरच विभागीय आयुक्तांनी ही तक्रार खोटी असल्याचे सांगत फेटाळून लावली. उलट महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्यांना साठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा अनुभव विचारात घेऊनच राष्ट्रवादीचे असंख्य नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात आहेत. 

आमदार लांडगे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करते झाल्यानंतर आता शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक नगरसेवक पक्ष प्रवेशाच्या तयारीत आहेत. दरम्यान, मोदी सरकारने केलेली नोटाबंदी आणि राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने जनतेने दिलेला कौल; तसेच महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी भाजपने मंगळवारी काढलेला महामोर्चा यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी ठरावावरील ऐनवेळच्या उपसूचनांना विरोध केल्याने पक्षातील नेत्यांच्या अस्वस्थतेत आणखीच भर पडली. गेल्या तीन-चार दिवसांतील घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या महापालिकेतील काही बड्या पदाधिकाऱ्यांसह 60 नगरसेवकांनी भाजपचे दार ठोठावण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणखीच अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. सरसकट प्रवेश देण्याऐवजी पक्षाच्या पाहणीत ज्यांची नावे आघाडीवर आहेत, अशांनाच अगोदर प्रवेश देण्याची तयारी दर्शविली आहे. या परिस्थितीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला नजीकच्या काळात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्‍यता आहे. 

""भोसरीतील वीस-बावीस नगरसेवक राष्ट्रवादीतून बाहेर पडणार, असा गवगवा केला. प्रत्यक्षात झाले काय? पाच नगरसेवकांच्यावर हा आकडा गेला नाही. आता चिंचवड विधानसभा मतदारसंघाची वेळ आहे. तिकडचेही चार नगरसेवक सोडले, तर अन्य कोणी पक्षातून बाहेर पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे.'' 
संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Web Title: sixty corporator contact in BJP