#HelpStudent विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे

#HelpStudent विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे

पुणे - आर्थिक दुर्बल घटक वर्गातून कष्ट करीत शिक्षणाची कास धरणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ बरोबरच आता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकृष्ट्या स्वावलंबी करण्याचा संकल्प डॉ. अच्युतराव आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थी सहायक समितीने पत्रकार परिषदेत गुरुवारी जाहीर केला. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नगरमध्ये समितीची शाखा पुढील वर्षी जूनपर्यंत उघडण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. 

ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने डॉ. आपटे यांनी विद्यार्थी सहायक समितीची १९५५ मध्ये स्थापना केली. तीन विद्यार्थ्यांपासून सुरवात केल्यावर आता समितीचे कार्य विस्तारले असून, शहरात पाच वसतिगृहांत सुमारे ७७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. आपटे यांचे जन्मशताब्दी वर्ष ८ नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहे. त्या निमित्ताने आगामी काळातील उपक्रमांची माहिती समितीचे अध्यक्ष प्रताप पवार, कार्यकारी विश्‍वस्त तुकाराम गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पवार म्हणाले, ‘‘समितीच्या माध्यमातून केवळ वसतिगृह चालविले जात नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून स्वावलंबनाचे धडे देत चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यात येते. समाजाच्या विविध घटकांच्या सहकार्याने गेल्या ५५ वर्षांपासून हे कार्य सुरू असून, आगामी वर्षात त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.’’ नगरमध्ये नवे वसतिगृह, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजित करणे, अभ्यासिका उभारणे, समाजाच्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आदी उपक्रम आगामी वर्षात राबविण्यात येणार आहेत.

गायकवाड म्हणाले, ‘‘संस्थेत सध्या विदर्भ-मराठवाड्यातील सुमारे ४५० विद्यार्थी असून, सुमारे ३० विद्यार्थी दिव्यांग आहेत. तसेच लेह-लडाख, अरुणाचल प्रदेश येथील गरजू विद्यार्थ्यांनाही संस्थेने संधी दिली आहे. संस्थेत विद्यार्थी- विद्यार्थिनी, जात-धर्म असा भेदभाव केला जात नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला कमवा- शिका योजनेतून स्वावलंबनाची शिकवणही दिली जाते.’’ 

संस्थेचे माजी विद्यार्थीही समितीच्या कामात वाढत्या संख्येने सक्रिय आहेत. कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी कोणतेही मानधन न घेता ते संस्थेचे कामकाज चालवतात, ही संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले. 

‘कमवा आणि शिका’मधून स्वावलंबन 
संस्थेत दाखल मुलाला निवास, आहार आणि सर्व प्रकारची शैक्षणिक मदत केली जाते. एका विद्यार्थ्यामागे वर्षासाठी सुमारे ४५ हजार रुपये खर्च येतो. त्यातील २२ हजार रुपये संबंधित विद्यार्थी स्वहिस्सा आणि ‘कमवा आणि शिका’ योजनेतून उभारतो, तर उर्वरित २३ हजार रुपये संस्था देणगीदारांच्या माध्यमातून उभारते. प्रत्येक विद्यार्थी सुमारे अर्धा तास दररोज संस्थेत विविध प्रकारचे काम करतो. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून व्यायाम, योगासने, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आरोग्य शिबिर आदी विविध उपक्रमही त्यांच्यासाठी राबविले जातात, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

आपण अशी करू शकता मदत 
वाढदिवस, स्मृतिप्रीत्यर्थ, आनंदप्रसंगी नागरिक संस्थेला मदत करू शकतात. एका विद्यार्थ्याच्या एक महिन्याच्या भोजनासाठी १ हजार रुपये, तर एक वर्षासाठी ११ हजार रुपये नागरिक देऊ शकतात. तर एका विद्यार्थ्याच्या भोजन आणि निवासासाठी एक महिन्यासाठी २ हजार रुपये, तर एक वर्षासाठी २२ हजार रुपये संस्थेला देणगी म्हणून देऊ शकतात. तसेच संस्थेला देणगी दिल्यास प्राप्तिकरात सवलतही मिळू शकते, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com