शाळांसमोर हवाय ‘स्कायवॉक’

आशा साळवी
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

पिंपरी - दुपारची साडेबाराची वेळ. शाळांसमोरील रस्ते विद्यार्थ्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेले. काही विद्यार्थी स्कूलबसमधून उतरत शाळेकडे धाव घेतात, तर काही विद्यार्थी रस्ता ओलांडण्यासाठी थांबतात. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही संधी न मिळाल्याने त्यातील काही विद्यार्थी जीव धोक्‍यात घालून ओलांडतात.. शहरातील बहुतांश शाळांसमोर दररोज दिसणारे हे विदारक चित्र. विद्यार्थ्यांची ही असुरक्षितता थांबविण्यासाठी शाळांसमोर ‘स्काय वॉक’ किंवा फूट ओव्हरब्रीज उभारण्यात यावा, अशी मागणी आता शाळांमधून होऊ लागली आहे.

पिंपरी - दुपारची साडेबाराची वेळ. शाळांसमोरील रस्ते विद्यार्थ्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेले. काही विद्यार्थी स्कूलबसमधून उतरत शाळेकडे धाव घेतात, तर काही विद्यार्थी रस्ता ओलांडण्यासाठी थांबतात. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही संधी न मिळाल्याने त्यातील काही विद्यार्थी जीव धोक्‍यात घालून ओलांडतात.. शहरातील बहुतांश शाळांसमोर दररोज दिसणारे हे विदारक चित्र. विद्यार्थ्यांची ही असुरक्षितता थांबविण्यासाठी शाळांसमोर ‘स्काय वॉक’ किंवा फूट ओव्हरब्रीज उभारण्यात यावा, अशी मागणी आता शाळांमधून होऊ लागली आहे.

आकुर्डीतील खंडोबामाळ चौकातील गोदावरी हिंदी विद्यालयासमोरील चित्र तर आणखी भयावह. ही शाळा पुणे- मुंबई रस्त्यालगत आहे. त्यामुळे अवजड वाहनांसह सर्वच प्रकारच्या वाहनांची येथे सातत्याने रीघ लागलेली असते. अशा या वाहतुकीमधून वाट काढताना विद्यार्थ्यांचा जीव प्रचंड मेटाकुटीला येतो. मात्र, धोका पत्करण्याशिवाय त्यांच्याकडे गत्यंतर नसते. 

गोदावरीप्रमाणेच आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, निगडी, प्राधिकरण, भोसरी अशा परिसरात बहुतांश शाळा रस्त्यालगत आहेत. आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालय परिसरातील चित्रही थोड्याफार फरकाने असेच. विद्यार्थ्यांच्या असुरक्षिततेला केवळ वाहतूक कारणीभूत नाही, तर रस्त्यालगत होणारे बेशिस्त पार्किंग, खासगी प्रवासी वाहने आणि हातगाड्यांकडून होणारी अतिक्रमणेही सुरक्षिततेला धोका पोचवतात. त्याकडे महापालिका, शाळा आणि पोलिस प्रशासनाकडून सर्रास दुर्लक्ष केले जाते. 

पिंपरीतील जयहिंद हायस्कूलसमोरही वाहतूक कोंडी ठरलेली. पाल्यांना सोडण्यासाठी व आणण्यासाठी आलेले पालक आपली वाहने घेऊन रस्त्यावरच थांबतात. तेथेच पीएमपी बसथांबा आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या आहेत. सकाळी दहाच्या सुमारास या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी असते. मोरवाडीतील सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या बहुतांश पालकांना वाहने पार्किंग करण्यासाठीही जागा मिळत नाही. परिणामी, पालक आपली वाहने रस्त्यावरच लावतात. त्यातच स्कूलबसकडून जागा अडविल्या जातात. साहजिकच वाहतूक कोंडीची समस्या उग्र रूप धारण करते.  अशावेळी जीव धोक्‍यात घालून विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत असल्याची पालकांची तक्रार आहे.

याबाबत करिफा सिंग हा विद्यार्थी म्हणाला, ‘‘शाळा भरताना व सुटल्यावर शाळेभोवती मोठी वाहतूक कोंडी होते. जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडून जावे लागत आहे. त्यातही भरधाव व कर्णकर्कश आवाज करीत जाणारी वाहने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या मनात भीती निर्माण करतात.’’

रस्त्यालगतच्या शाळा
गोदावरी विद्यालय, श्री म्हाळसाकांत विद्यालय, सरस्वती विद्यालय, सीएमएस विद्यालय (प्राधिकरण), सेंट उर्सुला (आकुर्डी), रेणुका शाळा (मोरवाडी), जैन स्कूल (चिंचवडगाव), सेंट ॲण्ड्रयूज, महापालिकेची चापेकर शाळा, प्रतिभा कॉलेज (चिंचवड स्टेशन), पीसीएमसी स्कूल, बी.टी. मेमोरिअल स्कूल (काळेवाडी), लांडेवाडी महापालिका शाळा (भोसरी).

खंडोबा माळ चौकात वाहतूक कोंडीची समस्या नित्याची आहे. विद्यार्थ्यांबरोबर कंपनीतील कामगारांनाही ही समस्या भेडसावते. दुर्घटना टाळण्यासाठी अशा शाळांसमोर स्कायवॉकची बांधण्याची मागणी सातत्याने महापालिकेकडे केली आहे.
- राध्येश्‍याम मिश्रा, प्राचार्य गोदावरी हिंदी विद्यालय

Web Title: Skywalk to School Student