वहिनींच्या गाडीमुळे चेहरा झाला पंक्चर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
वहिनींच्या गाडीमुळे चेहरा झाला पंक्चर!

वहिनींच्या गाडीमुळे चेहरा झाला पंक्चर!

‘अहो, पावभाजी कशी झालीय सांगा ना,’ स्मिताने अमोलला लाडीकपणे म्हटले. मग त्याने लगेचच वाटीतील पावभाजीची चव चाखली व तोंड वेडंवाकडं करत तो म्हणाला, ‘अगं ही पावभाजी आहे की दोडक्याची भाजी आहे. एकदम बेचव झालीय. शेजारच्या सुमनवहिनींसारखी कर ना, एकदम झणझणीत. नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. तू एकदा वहिनींकडून पावभाजीची रेसिपी शिकून घे ना.’

अमोलच्या या बोलण्यावर मात्र गहजब उडाला. ‘‘मी इकडे रात्रं-दिवस मरमर मरते आणि यांना शेजारणीचे कौतुक सुचतंय.’’ स्मिताच्या या वाक्याला भांड्यांच्या आदळआपटीचे पार्श्वसंगीत लाभल्याने पुढचा धोका ओळखून अमोल शांत बसला. मग पंधरा मिनिटे कोणीच काही बोललं नाही. स्मिताचा रागही आता ओसरला होता. ‘‘पावभाजीत अजिबात मीठ नाही. तुम्ही लगेचच दुकानातून मिठाचा पुडा आणून द्या.’’

स्मिताचं मौन या एका आदेशावर सुटल्याने अमोलही खूष झाला. ‘फक्त पाच मिनिटांत आणतो’ असं म्हणून तो घराबाहेर पडला.

कोपऱ्यावरील किराणामालाची दोन्ही दुकाने बंद असल्याने तो चौकातील दुकानांकडे जाऊ लागला. दहा मिनिटे चालल्यानंतर त्याला सुमनवहिनी दुचाकी ढकलत असल्याचे दिसले. वहिनींना पाहताच अमोलचा चेहरा उजळला. ‘वहिनी काय झालं?’ अमोलनं विचारलं.

हेही वाचा: महापालिकेतील २३ गावातील बांधकाम परवानगीचे अधिकार PMRDA कडे

‘अहो गाडी पंक्चर झालीय. पंक्चरवाल्याचं दुकान शोधतेय.’ वहिनींनी असं म्हटल्यावर अमोलमधील ‘नारायण’ जागा झाला. ‘‘वहिनी, तुम्ही कशाला काळजी करता. पंक्चरचं माझ्यावर सोपवा.’ असं म्हणत त्याने गाडी ताब्यात घेतली व तो स्वतः गाडी ढकलू लागला. शेजारच्या हॉटेलमध्ये वहिनींना बसवून त्याने मसाला डोसाची ऑर्डर दिली व चौकातील दुकानात त्याने पंक्चर काढायला गाडी दिली. ‘अर्ध्या तासात पंक्चर काढतो,’ असं तेथील कामगाराने म्हटलं. आता अर्धा तास काय करायचं, हा प्रश्न अमोलपुढं होता.

‘अण्णा, हमको शिकाव ना पंक्चर काढने का. कभी कभी हमारे पास इकडे आणे को टैम नही होता, तो हम घरपरच पंक्चर काढ लेंगे.’ मात्र अमोलचं हिंदी ऐकून त्या कर्मचाऱ्याने दुर्लक्ष केले. मग मात्र अमोल काहीच बोलला नाही. मुकाट्याने त्याचं काम पाहू लागला. अर्ध्या तासात कामगाराने पंक्चर काढली. अमोलने त्याला पैसे दिले व गाडी घेऊन तो हॉटेलमध्ये आला. वहिनी त्याचीच वाट पाहत होत्या.

‘भावोजी, तुम्ही मला आज खूप मदत केलीय. माझ्याकडून तुम्ही चहा तरी घेतलाच पाहिजे.’ असा आग्रह वहिनींनी धरल्यावर अमोलला तो मोडवेना. वीस मिनिटांनंतर दोघेही हॉटेलमधून बाहेर पडले. अमोल गाडी चालवू लागला तर वहिनी पाठीमागे बसल्या. दरम्यान, दीड तास झाला तरी आपल्या नवऱ्याने मिठाचा पुडा का आणला नाही म्हणून स्मिता सोसायटीच्या गेटजवळ आली. तेवढ्यात एकाच गाडीवरून अमोल व वहिनीही तिला येताना दिसले. समोर स्मिताला पाहताच अमोल भांबावून गेला व पटकन उतरून त्याने गाडी वहिनींच्या हातात दिली.

‘काय हो मीठ आणायला त्या बयेला घेऊन समुद्रकिनारी गेले होते काय? तरी म्हटलं आज सकाळी त्यांच्या पावभाजीचं लई कौतुक का चाललंय? त्यामागील खरं कारण आता मला कळलं. तुम्ही आधी घरी चला. मग तुमच्याकडे बघते. पण मिठाचा पुडा कुठंय? स्मिताच्या या सरबत्तीमुळे अमोलला घाम फुटला.

‘अगं आणणारऽऽच होतो. आता आऽणतोऽऽ...’ असं म्हणत तो ततपप करू लागला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Panchnama
loading image
go to top