शपथपत्राचा ‘केक’ | Panchnama | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
शपथपत्राचा ‘केक’

शपथपत्राचा ‘केक’

‘या या! काय हवंय तुम्हाला?’’ केक शॉपमधील विक्रेत्याने हसत शुभम व त्याच्या मित्रांना विचारलं.

‘काका, बिरबल-बादशहाचं एक पुस्तक आणि टी शर्ट-पॅंट हवी होती.’’ धीरजनं असं म्हटल्यावर सगळ्यांनी खिदळत एकमेकांना टाळ्या दिल्या.

‘तुम्ही केक शॉपमध्ये आलाय. येथे पुस्तकं आणि कपडे मिळत नाहीत.’’ संयम ठेवत दुकानमालकानं म्हटलं.

‘हे कळतं ना? मग तुम्हाला काय हवंय असं का विचारलं. आम्ही केकच घ्यायला आलो असेल ना?’’ प्रमोदनं म्हटलं. ही मुलं आपली फिरकी घेत आहेत, याची कल्पना मालकाला आली.

‘बरं तुम्हाला कशाला केक हवाय’’? मालकाने थेट विचारले.

‘कशाला म्हणजे? वाढदिवसाला. तुमच्याकडे केक लग्नात कापतात का?’’ धीरजने असं म्हटल्यावर पुन्हा हास्याचा फवारा उडाला.

‘तसं नव्हे. कशाला म्हणजे खायला की तोंडावर फासायला?’’ दुकानमालकाने सरळ प्रश्‍न विचारला.

‘दोन्हीमध्ये काय फरक आहे.?’’ शुभमने विचारले.

‘तोंडावर फासायच्या केकमध्ये कोरफड, चंदन, हळद आदी घटक असतात. हा केक तोंडावर फासल्यास चेहऱ्याची कांती उजळते व तुम्ही पुन्हा तरुण दिसता पण हा केक थोडा महाग आहे.’’ मालकाने ही माहिती दिल्यावर चौघेजण एकमेकांकडे बघायला लागले.

‘बरं तुम्ही हा वाढदिवस कोठे साजरा करणार आहात? घरी की रस्त्यावर. रस्त्यावर करणार असाल तर एक हजार रुपये डिपॉझिट भरावे लागेल. तसेच वाढदिवस साजरा केल्यानंतर रस्त्यावर अस्वच्छता करणार नाही तसेच हुल्लडबाजी करणार नाही, असे शपथपत्र तुम्हाला भरून द्यावे लागेल. आमचा माणूस येऊन, रस्त्याची पाहणी करील व तिथे अस्वच्छता दिसल्यास तुमचे एक हजार रुपये डिपॉझिट जप्त केले जाईल. त्यानंतर तसा अहवाल पोलिसांना व महापालिकेला दिला जाईल.’’ दुकानमालकाने सांगितले.

हेही वाचा: Pune : दिव्यांग, अर्भवती महिलांचे वर्क फ्राॅम बंद

‘कायतरीच काय? असं कुठं असतं का?’’ शुभमने शंका विचारली.

त्यावर दुकानमालकाने केक विकतानाची महापालिका व पोलिसांची नियमावलीच दाखवली.

‘हा केक आम्ही तलवारीने वा कुऱ्हाडीने कापणार नाही, असं शपथपत्रही तुम्ही लिहून द्यायचं आहे. हा केक फक्त आम्ही दिलेल्या प्लास्टिकच्या सुरीनेच कापायचा आहे. त्यासाठी केक कापतानाचा व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवायचा आहे. त्यासाठीचे डिपॉझिटही तुम्ही भरायचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून, तुम्ही केक कापल्याचा व्हिडिओ आम्ही पाहू व त्यानंतर आम्ही आपले डिपॉझिट परत करू. मात्र, याचं उल्लंघन झाल्यास पोलिस कारवाई केली जाईल.’’ दुकानमालकाने आणखी माहिती पुरवली.

‘तसेच ज्याचं नाव केकवर टाकायचं आहे, त्याचं संमतिपत्र पोलिसांनी अत्यावश्‍यक केलं आहे कारण अनेकजण काहीही टोपणनाव टाकून, भांडणाला आमंत्रण देतात, असा आमच्याबरोबरच पोलिसांचाही अनुभव आहे.’’ दुसऱ्या विक्रेत्याने माहिती पुरवली.

‘केक घेताना आधारकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र किंवा पॅनकार्ड यापैकी दोन कागदपत्रांच्या झेरॉक्स तुम्हाला द्याव्या लागतील. त्यानंतरच केकची डिलिव्हरी दिली जाईल.’’ दुकानमालकाने स्पष्ट केलं.

‘पण साहेब, आम्ही घरीच साध्या पद्धतीने कुटुंबीयांसमवेत वाढदिवस साजरा करणार असलो तर काय करावे लागेल?’’ शुभमने अतिशय नम्रतेने विचारले. मघाचा खट्याळपणा आता लुप्त झाला होता.

‘कसलीही हुल्लडबाजी न करता, पारंपरिक पद्धतीने घरगुती वातावरणात वाढदिवस साजरा केल्यास, आम्हीच बिलामध्ये तीस टक्के डिस्काऊंट देऊ.’’ दुकानमालकाने म्हटले.‘डिस्‍काऊंट नको, पण नियमावली आवरा,’असे म्‍हणत शुभमच्या मित्रांनी केक विकत घेतला. ते गेल्यानंतर दुकानमालक त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत खट्याळपणे हसू लागला.

loading image
go to top