
गेल्या काही वर्षांपासून शुभमचं लग्न ठरत नसल्याने तो वैतागला होता. काही ना काही खुसपट काढून, मुली आपल्याला नकार देतात, अशी खंत तो मित्रमंडळींमध्ये सतत व्यक्त करायचा.
‘चेहरा सजा के रखना, मेहंदी लगा के रखना’
गेल्या काही वर्षांपासून शुभमचं लग्न ठरत नसल्याने तो वैतागला होता. काही ना काही खुसपट काढून, मुली आपल्याला नकार देतात, अशी खंत तो मित्रमंडळींमध्ये सतत व्यक्त करायचा. ‘चेहरा सजा के रखना, मेहंदी लगा के रखना’ हे गाणं सतत यूट्यूबवर बघून तो स्वतःला दिलासा देत राहायचा. एकदा तो एका वधुपित्याला भेटायला गेला होता.
गेल्यागेल्या त्याने स्वतःची धडाधड माहिती द्यायला सुरवात केली.
‘नमस्कार ! मी शुभम अरविंद काळोखे. उम्र- ३०. कदकाठी- पाच फूट सहा इंच, राहणार.....’ वधुपत्याने त्याला मध्येच थांबवत म्हटले.
‘माझं घर म्हणजे तुला पोलिस ठाणं वाटलं काय? एवढी माहिती कशाला देतोस. माझं वॉशबेसिन तुंबलंय. तेवढं दुरुस्त कर आणि तुझे काय पैसे असतील, ते घेऊन जा.’ वधुपित्याने म्हटले. मुलीचे वडील आपल्याला प्लंबर समजल्याचे पाहून शुभमचा चेहरा उतरला.
‘तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुमच्या मुलीचा हात मागण्यासाठी आलोय. कसंही करा पण मला होकार द्या. माझ्यावर फार उपकार होतील.’ काकुळतीला येत शुभमने म्हटले.
‘नुसता हात घेऊन काय करणार आहेस? मागणार असशील तर सगळी मुलगी माग.’ वधुपित्याने त्याची फिरकी घेतली. त्यावेळी शुभमचा आनंद गगनात मावेनासा झाला.
‘पण तू करतोस काय?’ वधुपित्याने विचारले.
‘मी व्हॉटसअप ग्रुपवर पाच ग्रुपचा ॲडमिन आहे. शिवाय इन्स्टाग्रॅमवर मला तब्बल दोनशे फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर तीन चॅनेलचा मालक आहे. सबक्राईबची संख्या वाढल्यावर लवकरच मला त्यांच्याकडून महिन्याला दोन- तीन लाख रुपये सहज मिळतील.’ शुभमने छाती फुगवत सांगितले. त्यावेळी वधुपित्याने जंजीर चित्रपटातील अमिताभसारखं उठून, तो बसलेल्या खुर्चीवर लाथ मारली. ‘यह मेरा घर है, तुम्हारे बाप का नही. माझा मुलगाही कामधंदे सोडून हेच सगळे उद्योग करतो म्हणून मी त्याला घराबाहेर काढलंय आणि आता जावईही मी तसलाच करू काय?’ असं म्हणून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर शुभमने असलं काही सांगून मुलींच्या वडिलांवर इंप्रेशन पाडायचं बंद केलं. आता तो थेट मुलींना प्रेमात पाडण्यासाठी प्रयत्न करू लागला. पण कोणतीही मुलगी त्याला दाद देत नव्हती.
हेही वाचा: अजित पवार म्हणजे दर्जेदार विकास; शरद पवारांकडून शाबासकीची थाप
आपल्यावर शाल्मली प्रेम करत असल्याचा अंदाज शुभमला आला. गुडघ्यावर बसून, गुलाबाचं फूल द्यायचं, ही जुनाट संकल्पना मोडीत काढून आपण तिला हटके प्रपोज करायचं, हे त्यानं ठरवलं. एकदा तो बसस्टॉपवर शाल्मलीची वाट पहात बसला होता. ती येताच त्याने हाय करून स्मितहास्य केले. तिच्याजवळ जात तो म्हणाला, ‘शाल्मली, तुझा हात हातात दे ना.’ त्यानंतर त्याने तिच्या हातावर पेनाने ह्दयाचं चित्र काढून, त्यात बाण काढला. आपण आगळ्या- वेगळ्या पद्धतीने प्रपोज केल्याने शुभम स्वतःवर फार खूष झाला. पण त्याचा हा आगाऊपणा पाहून शाल्मली खूपच चिडली.
‘मूर्खा, एका मुलीशी असं वागतात का? मी तुला किती सभ्य समजत होते. आताच्या आता माझ्यासमोरून तुझं तोंड काळं कर.’ असं म्हणून तिने सगळ्यांदेखत त्याचा अपमान केला. शाल्मलीचे शब्द त्याच्या फार जिव्हारी लागले. तरीही सगळं अवसान गोळा करून, तो म्हणाला, ‘मी तुझा हात हातात घेतला म्हणून तू माझा घनघोर अपमान केलास. पण एक लक्षात ठेव तुझ्यापेक्षा सुंदर मुली त्यांचे हात माझ्या हातात आनंदाने देतील. मीदेखील तास- तासभर त्यांचे हात हातात घेऊन बसेल. तेवढं कर्तृत्व मी नक्कीच कमवेन.’ अशी प्रतिज्ञा करून शुभम तेथून निघून गेला. सध्या तो मुलींच्या हातावर आकर्षक मेंदी काढायचे काम करतो.
Web Title: Sl Khutwad Writes 20th February 2022 Panchnama
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..