आनंदाश्रूंनी भिजलं माहेरचं घरटं... | SL Khutwad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
आनंदाश्रूंनी भिजलं माहेरचं घरटं...

आनंदाश्रूंनी भिजलं माहेरचं घरटं...

दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीच्या हक्कसोड पत्रावर सही करताना आतून काहीतरी तुटतंय, याची जाणीव मानसीला होऊ लागली होती. सगळ्या सह्या व्यवस्थित झाल्याचे मनोजने चार- पाच वेळा खात्री केली. वकिलाने अंगठ्याने ‘ओके’ची खूण करताच मनोजचा चेहरा उजाळला.

कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मानसीच्या हातात साडी देत मनोज म्हणाला, ‘ताई ! आज खूप घाईत आहे. परत भेटू’ असे म्हणून तो वकिलाबरोबर निघून गेला. झाडाखाली थांबलेल्या नवऱ्याजवळ पोचल्यावर मात्र तिच्या मनाचा बांध फुटला. ‘माझं माहेर कायमचं तुटलं हो’ असं म्हणत ती रडू लागली.

‘अगं आपल्याला परमेश्‍वरानं भरपूर दिलंय. कशाला उगाचंच माहेरच्या प्रॉपर्टीत हक्क दाखवायचा.’ असे म्हणत परेशने तिची समजूत घातली. ‘प्रॉपर्टीचं जाऊ द्या. पण माझी सही झाल्यानंतर मनोज किती तुटकपणे वागत होता. भावा-बहिणीचं नातं इतकं कमकुवत असतं.?’ असं म्हणून रडतच ती गाडीत बसली. संपूर्ण प्रवासात माहेरच्या आठवणींनी तिच्याभोवती फेर धरला.

‘माझी चिऊताई,’ असं म्हणत बाबांनी केलेले लाड तिला आठवत राहिले. दर वाढदिवसाला चिमणीचं चित्र व ‘चिऊताई’ असं लिहिलेला केक बाबा खास तालुक्याच्या गावी जाऊन घेऊन यायचे. लग्नाच्या वेळीस सासरी पाठवणी करताना भर मंडपात ‘चिऊताई’ अशी जोरात हाक मारून, ढसाढसा रडलेले बाबा आठवले की तिला आजही गलबलून येतं. शिस्तीबरोबरच आईने केलेले संस्कारही तिला आठवत राहिले. मनोजला तर सगळे जण ‘चिऊताईची शेपटी’ असेच चिडवत असायचे. आपल्याशिवाय त्याला एक मिनिट करमायचं नाही. ‘ताईच्या ताटातच जेवायचंय,’ असं हट्ट धरणारा, आपल्यासाठी मैत्रिणींसोबत भांडण करणारा, ताईला आवडते म्हणून स्वतःची पिगी बॅंक फोडून चोकोबार आणून देणाऱ्या मनोजची विविध रूपे तिला आठवत राहिली. भैरवनाथाच्या यात्रेत पाच वर्षांचा असताना मनोज चुकला होता. त्यावेळी रडून रडून तिचे डोळे सुजले होते, या आठवणीने पुन्हा तिचे डोळे ओले झाले. आई- बाबा होते, तोपर्यंत तिचं माहेरपण सगळ्यांनी जपलं पण दोन वर्षापूर्वी दोघेही एकापाठोपाठ देवाघरी गेल्यानंतर तिला पहिल्यांदा परकेपणाची जाणीव झाली.

हेही वाचा: सहकारी संस्थांनी आर्थिक वाढीत सभासदांना हिस्सा द्यावा

मनोजने गावात टुमदार बंगला बांधला पण कोरोनामुळे वास्तूशांतीला भटजी व्यतिरिक्त बाहेरच्या कोणालाही बोलावलं नाही. मनोजने किमान आपल्याला तरी बोलवायला हवं होतं, याची हुरहूर तिला वाटायची आणि आता तर हक्कसोड पत्रावर सह्या घेतल्यानंतर उरलासुरला हक्कही संपलाय, असं तिला वाटू लागलं.

मानसीचा आज वाढदिवस होता पण तिला कशातच उत्साह वाटत नव्हता. मात्र, सकाळीच मनोजने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘तुझा वाढदिवस आपण आपल्या नव्या घरी साजरा करू,’ असा प्रस्ताव त्याने दिला. मानसीचं मन मोहरून उठलं. ‘मला माहेरी सोडा,’ असा हट्ट तिने परेशकडे धरला. तासाभरात मुलांचे आवरून ती माहेरी जाण्यास निघाली.

‘बंगल्याच्या जागेचं हक्कसोड पत्र राहिलं असणार. त्यासाठीच तुला बोलावलंय. कसला आलाय वाढदिवस? मनोज काय केक आणणार नाही. त्यामुळे आपणच केक घेऊन जाऊ,’ असं परेशने म्हटल्यावर तिला वाईट वाटलं. संध्याकाळी केकचा बॉक्स उघडल्यानंतर तिला सुखद धक्का बसला. केकवर चिमणीचं चित्र व त्यावर ‘चिऊताई’ असं लिहिलं होतं. ते पाहून तिला बाबांची फार आठवण झाली. जेवण झाल्यानंतर मनोजने तिच्या हातात एक फाईल दिली.

‘ताई, निम्मी जमीन तुझ्या नावावर केल्याची ही कागदपत्रे आहेत. यंदा तुझ्या शेतात पिकलेल्या धान्याची रास समोर आहे. उद्या सकाळी टेंपोमधून हे धान्य तुझ्या घरी पोच होईल.’ मनोजने म्हटले.

त्यानंतर सगळा बंगला त्याने तिला फिरून दाखवला. मात्र, एका खोलीला कुलूप पाहून, तिला आश्‍चर्य वाटलं. मनोजने ती खोली उघडली. तिच्या लहानपणीची छायाचित्रे, खेळणी व कपड्यांनी ती सजवलेली होती. लग्न होईपर्यंतच्या तिच्या वस्तूही व्यवस्थित मांडल्या होत्या.

‘ताई, ही तुझी खोली आहे. तुझं माहेरपण कायमस्वरूपी जपणं, हे माझं कर्तव्य आहे,’ असे म्हणून मनोजने तिच्या हातात खोलीची चावी सोपवली अन् काही क्षणातच ती खोली आनंदाश्रूंनी भिजली.

loading image
go to top