पुण्यात मेट्रो सकाळीच धावली; चर्चा ‘दम’ बिर्याणीचीच रंगली

‘क्काऽऽय !’’ साहेबांना मोठा धक्का बसला. ‘‘बाप रे! आपण असं कोणाकडून खरेदी केल्यानंतर पैसे देतो? मग आपल्या हद्दीतील व्यापाऱ्यांचा आपल्याला उपयोग काय? तुम्ही हे चुकीचं वागताय.
Panchnama
PanchnamaSakal

‘आपल्या हद्दीतील दुकानातून कडुनिंब, इलायची आणि लवंग घातलेली टूथपेस्ट लवकर घेऊन या. तसेच साबण व बिस्किटचे पुडेही आणा.’ साहेबांनी कर्मचाऱ्याला आदेश दिला. यावर कर्मचारी पेमेंटबाबत बोलला.

‘क्काऽऽय !’’ साहेबांना मोठा धक्का बसला. ‘‘बाप रे! आपण असं कोणाकडून खरेदी केल्यानंतर पैसे देतो? मग आपल्या हद्दीतील व्यापाऱ्यांचा आपल्याला उपयोग काय? तुम्ही हे चुकीचं वागताय. इथून पुढं तरी सुधारा. मला हे तुमचं वागणं बिलकूल पसंत पडलं नाही. हे काम तुम्हाला जमेल ना व्यवस्थित की एखाद्या विभागप्रमुखाला सांगू,’’ साहेबांनी असं म्हणताच कर्मचाऱ्यानेही मान डोलावली. ‘‘साहेब, मी करतो व्यवस्था.’’ असं म्हणून कर्मचारी निघून गेला. दहा मिनिटांतच त्याने टूथपेस्‍ट, साबणाचा प्रत्येकी एक मोठा बॅाक्स आणला. सोबत दहा-बारा बिस्किटचे पुडेही आणले. ते पाहून साहेबही खूश झाले.

‘शाब्बास! अशी कामं जमली पाहिजेत. आयुष्यभर एक नियम कायम लक्षात ठेवा. आपल्या हद्दीत कोणालाही कशाचे पैसे द्यायचे नाहीत, पण आपणही दुसऱ्याच्या हद्दीत कधी अतिक्रमण करायचं नाही. एवढी नैतिकता आपण कायम पाळली पाहिजे. एवढं प्रामाणिकपणे वागलं तर आयुष्यभर तुम्हाला काही कमी पडणार नाही.’’ साहेबांचं बोलणं ऐकून कर्मचाऱ्याने मान डोलावली. थोड्यावेळाने त्यांनी फोन करून कर्मचाऱ्याला विचारले, की आपल्या हद्दीत सफरचंद, चिकू, सीताफळ, डाळिंब, मोसंबी, प्लम, ड्रॅगन ही ताजी फळे कोठे मिळतात?’’ कर्मचाऱ्याने ही फळे मार्केट यार्डमध्ये मिळत असल्याचे सांगितले.

‘अरे बाबा! आताच तुम्हाला काय सांगितलं. आपल्या हद्दीतूनच अशा गोष्टी आणायच्या. मार्केट यार्ड आपल्या हद्दीत येत नाही. आपल्या हद्दीतील व्यापाऱ्याला गाठून ही सगळी फळे आणा. डाळिंबावर तेल्या रोग नाही ना, याची खात्री करा. एकूण तेलकट काहीच नको. लूज सफरचंद नको. मॅडमला सीताफळ फार आवडतं. पण ते फार गोड असतं. त्यामुळे मी त्यांना ते देत नाही. त्यांच्यासाठी फार न पिकलेले व कमी गोड सीताफळ आणा. कडक असलेली किवी निवडा. ड्रॅगन नीट बघून आणा. अननस व्यापाऱ्याकडूनच कापून आणा. घरी कापायला फार त्रास होतो. अजून प्लमही आणा. पण ते लालभडक आणा. आणि महत्त्वाचं म्हणजे विक्रेत्याला पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका.’ असे म्हणून साहेबांनी फोन ठेवला. त्यानंतर दुपारी साहेबांनी परत त्या कर्मचाऱ्याला फोन केला. ‘‘माझ्या जिभेला चवच नाही हो. आपल्या हद्दीत बिर्याणी कोठे चांगली मिळते? त्याचबरोबर उत्तम प्रतीचा प्राॅन्सही हवा. मात्र त्यात जास्त मसाला नको. ओला बोंबिलही ऑर्डर करा.’’ असं सांगून त्यांनी बारीक-सारीक तपशिलासह पदार्थ कसे असावेत, याच्या सूचना दिल्या. तसेच ते फुकट कसे आणायचे, हेही सांगितले.

कसं काय कुणास ठाऊक पण ही ऑडिओ क्लीप पुण्यात तुफान व्हायरल झाली. नेमकं त्याचदिवशी सकाळीच मेट्रो धावून पुणेकरांचे एक स्वप्न साकारलं होतं. त्यामुळे दिवसभर पुणेकरांच्या तोंडी मेट्रोचा विषय असेल, असा अंदाज होता. मात्र, त्या दिवशीच्या टॅापटेनमधील चर्चेत पहिल्या स्थानावर ‘दम’ बिर्याणी जास्त रुचकर लागत होती अन् दुसऱ्या स्थानावर मेट्रोने वेग पकडला होता. शुक्रवारी दिवसभर पुण्यातील चौका-चौकांत ‘दम’ बिर्याणीची चर्चा रंगत होती आणि मेट्रो मात्र नाराज होऊन, यार्डमध्ये जाऊन रुसली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com