esakal | साहेब, बायकोलाच मेमो द्या
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

साहेब, बायकोलाच मेमो द्या

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘काल तुम्ही ऑफिसला दांडी मारली. ऑफिस म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय? तुम्ही योग्य कारण दिलं नाहीत तर तुमची हकालपट्टी करण्यात येईल,’ बॉसने मनोजला चांगलाच दम भरला. ‘साहेब, काल मी ऑफिसला येण्यासाठी वेळेवर घरातून बाहेर पडलो. बसला गर्दी आणि वाहतूक कोंडी असल्याने मी कात्रज- शिवाजीनगर या लोकल हेलिकॉप्टरमध्ये बसलो. स्वारगेटला आल्यानंतर मी सोडून सगळे उतरले. शिवाजीनगरला जाण्यासाठी पॅसेंजर न राहिल्याने हेलिकॉप्टरचा ड्रायव्हर ‘शिवाजीनगर. . शिवाजीनगर... पन्नास रुपयांत शिवाजीनगर. . ’ असं सारखा ओरडत होता. पण कोणी प्रतिसाद दिला नाही. माझ्या एकट्यासाठी ड्रायव्हर शिवाजीनगरला यायला तयार नव्हता. मग मी नाईलाजाने खाली उतरलो. तिथून तसाच चालत बाजीराव रोडवर आलो. पण तिथे एका खड्ड्यांत पाय घसरून पडलो आणि तसाच वाहत वाहत पुढे आलो. महापालिकेने जलवाहतूक सुरू केली आहे, असं समजलो. लक्ष्मीरस्ता आल्यावर मी पाण्यातून बाहेर पडलो.’ ‘मग पुढे काय झाले?’ बॉसने दमात घेतले.

‘साहेब, या गडबडीत माझा डबा कोठंतरी हरवला होता. म्हणून मी बायकोला फोन केला की मी आता लक्ष्मी रस्त्यावर असून, माझा डबा. . .’ पण बायकोने लक्ष्मी रस्त्याचे नाव ऐकताच मला बोलूच दिले नाही. मी पाच मिनिटांत उरकून दहा मिनिटांत तिथे पोचते, असे बोलली आणि खरंच पंधरा मिनिटांत स्कूटी घेऊन ती लक्ष्मी रस्त्यावर पोचलीसुद्धा. ‘मला साड्य‍ा घ्यायच्यात’ असा हट्ट तिने धरल्याने आम्ही एका मोठ्या दुकानात शिरलो. पाच मिनिटांत तिने दोन साड्या खरेदी केल्या. ‘‘आपण इकडे आलोच आहोत तर सासूबाईंची भेट घेऊ या,’ असं बायको बोलली. सध्या माझी आई सदाशिव पेठेतील धाकट्या भावाकडे आहे. आईला भेटायला जायचं म्हणून तिने दोन हजारांची मिठाई व ड्रायफ्रूटस घेतले. आम्ही भावाच्या घरी पोचल्यावर बायकोने आईची गळाभेट घेतली. मग काय तब्बल तीन तास त्यांच्या गप्पा रंगल्या.

मी सारखा बायकोला ऑफिसची आठवण करून देत होतो. पण तिने दुर्लक्ष केले. शेवटी बायको मला तिच्या स्कुटीवरून सोडायला तयार झाली. कसंबसं ५.३५ मिनिटांनी मी ऑफिसमध्ये पोचलो तर वॉचमन म्हणाला, की पाच मिनिटांपूर्वीच ऑफिस सुटले आहे. सगळे घरी गेले आहेत.’ साहेब, यात माझा काय दोष आहे का? मी ऑफिसला आलो होतो पण फक्त पाच मिनिटे मला उशीर झाला होता.’ त्यावर हळूवार आवाजात बॉस म्हणाले, ‘‘तुमचं मला सगळं पटलं. पण लक्ष्मी रस्त्यावरील दुकानातून तुमच्या बायकोची साडीखरेदी फक्त पाच मिनिटांत कशी काय उरकली? हे मला मान्य नाही. त्यामुळे तुम्हाला मेमो द्यावा लागेल.’ ‘साहेब, पण ही चूक माझी नाही ना. बायकोची आहे. त्यामुळे मेमोही तिलाच द्या.’ मनोजने असं म्हटल्यावर मात्र बॉस चांगलेच बुचकाळ्यात पडले.

loading image