ज्यांना दिली मदतीची साथ; त्यांनीच दाखवला हात

समाजात घडणाऱ्या लूटमार आणि छेडछाडीच्या घटना पाहून मनोज पेटून उठायचा. यावर आपण आवाज उठवला पाहिजे, संबंधित व्यक्तीच्या मदतीला आपण धावून गेलं पाहिजे, असं त्याला नेहमी वाटायचं.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

समाजात घडणाऱ्या लूटमार आणि छेडछाडीच्या घटना पाहून मनोज पेटून उठायचा. यावर आपण आवाज उठवला पाहिजे, संबंधित व्यक्तीच्या मदतीला आपण धावून गेलं पाहिजे, असं त्याला नेहमी वाटायचं.

समाजात घडणाऱ्या लूटमार आणि छेडछाडीच्या घटना पाहून मनोज पेटून उठायचा. यावर आपण आवाज उठवला पाहिजे, संबंधित व्यक्तीच्या मदतीला आपण धावून गेलं पाहिजे, असं त्याला नेहमी वाटायचं. पण त्याच्या डोळ्यासमोर अशा घटना घडत नसल्याने तो निराश व्हायचा. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये अशा घटना वाचल्यानंतर

‘आपण तिथं पाहिजं होतं’, असं तो टेबलवर वा दगडावर मूठ आपटून म्हणायचा. आपण मदत करण्यास इच्छुक असल्याचे लोकांना कळावे, यासाठी ‘आपणास काही मदत हवी आहे का’? असा बोर्ड नेहमी तो हातात ठेवायचा. मात्र, चार- पाच जणांनी ‘दहा रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत मदत करता का?’ अशी मागणी केली तर अनेक जणांनी पत्ता विचारून त्याला वैताग दिला.

एकदा एकाने चारचाकी गाडीला धक्का मारायला सांगितला. एक- दोन किलोमीटरपर्यंत धक्का मारल्यानंतर त्याने गाडी स्टार्ट केली. ‘अहो, पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेत. तुम्ही गाडी ढकलल्यामुळे तेवढीच बचत झाली,’ असं म्हणत तो गाडीमालक वेगाने गेला. त्यामुळे त्याने बोर्डाचा नादही सोडून दिला.

Panchnama
पुणे : अल्पयवीन मुलीची खासगी छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी

एकदा तो सहज नयनरम्य दृश्‍य पाहत रस्त्याने चालला होता. थोडं पुढं गेल्यानंतर एका तरुणीच्या हातातील पिशवी एका चोराने हिसकावल्याचे दृश्‍य त्याने पाहिले. मग काय क्षणाचाही विचार न करता त्याने त्या चोराचा पाठलाग करायला सुरवात केली. जवळच्या गल्लीत तो चोर घुसल्यावर मनोजने त्याला बरोबर पकडलं. त्यावेळी त्याने त्याला चाकू दाखवला. ते पाहून मात्र तो थोडा बिचकला. मात्र, तरीही प्रसंगावधान राखत त्याने चोरावर झेप टाकली व त्याच्या हातातून त्याने ती पिशवी हस्तगत केली. आपल्याला आता लोकांचा मार पडेल, या भीतीने चोराने धूम ठोकली. तरुणीची पिशवी हातात मिळाल्यानंतर मनोजनेही चोराचा पाठलाग करण्याचे थांबवले. आपल्या या पराक्रमावर मनोज भलताच खूष झाला. गेल्या काही दिवसांपासून त्याने केलेल्या मदतीची अनेकांनी चेष्टा केली होती. मात्र, ‘जीव धोक्यात घालून, तरुणाने पाठलाग करून, चोराला पकडले,’ अशी बातमी वर्तमानपत्रात आल्यानंतर हीच मंडळी आपले गुणगान गातील, याची त्याला खात्री होती.

तरुणीच्या हातात पिशवी दिल्यानंतर ती आपल्याला धन्यवाद म्हणेल. समोरच्या हॉटेलात चहा प्यायला चला, असे म्हणेल. त्यावेळी चहा पिता पिता आपण तिला व्हॉटसअप नंबर मागायचा, असे मनोजने ठरवले. त्यानंतर आपण तिला घरी येण्याचे निमंत्रण द्यायला विसरायचे नाही, असंही त्याने मनातल्या मनात ठरवले. थोड्याच वेळात ती तरुणी उभी होती, तिथं तो पोचला. मात्र ती त्याला दिसली नाही. त्यावेळी मात्र तो हबकला. मात्र, थोडं पुढं गेल्यानंतर त्याने तिचा शोध घेतला. मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने तिच्याकडे पिशवी सुपूर्त केली. तिने ती मुकाट्याने हातात घेतली व ती चालू लागली. ‘अरे हे काय ! धन्यवाद नाही की चहाचं निमंत्रण नाही,’ असे पुटपुटत मनोज तिच्याकडं बघू लागला. काही क्षणातच तिने ती पिशवी कचऱ्याच्या डब्यात टाकून, ती लगबगीने निघून गेली.

‘अरे बाप रे ! आपण ज्या पिशवीसाठी जीव धोक्यात घातला, त्या पिशवीत कचरा होता होय ! ’ असं म्हणून त्याने डोक्यावर हात मारून घेतला.

सध्या मनोजने रस्त्यावरील कचराकुंड्यांच्या विरोधात जोरदार रणशिंग फुंकले आहे. ‘रस्त्यातील कचराकुंडीमुळे नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा कुंड्या हटवून, रस्ते व गल्लीबोळांची साफ- सफाई करा. घरांमधील कचरा नेण्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवा,’ असे पत्र त्याने तातडीने महापालिकेचे आयुक्त व महापौरांना पाठवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com