Panchnama
PanchnamaSakal

दादल्याला ना दात कोरोनाने केला घात

साहेब, गेल्या आठवड्यात माझा विवाह कोरोनाच्या अटी व नियमानुसार झाला. नवऱ्या मुलाने विवाह मंडळाच्या वेबसाइटवर भांडी घासतानाचे व लादी पुसण्याचे फोटो टाकले होते.

मा. पोलिस निरीक्षक, पुणे.

विषय - एका सुंदर, सत्यवचनी व ग्रहकर्तव्यदक्ष मुलीची घोर फसवणूक झाल्याबाबत.

साहेब, गेल्या आठवड्यात माझा विवाह (Marriage) कोरोनाच्या (Corona) अटी व नियमानुसार झाला. नवऱ्या मुलाने विवाह मंडळाच्या वेबसाइटवर (Website) भांडी घासतानाचे व लादी पुसण्याचे फोटो टाकले होते. त्यामुळे असले स्थळ मी हातचे कसे घालवेल? मात्र, लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी खरकट्या भांड्याचा पसारा माझ्या पुढ्यात मांडल्याने मी हबकून गेले. जागरण नाही, गोंधळ नाही; इतकंच काय हनिमूनही (Honeymoon) नाही अन् डायरेक्ट पुढ्यात भांड्याचा ढीग म्हणजे काय? मी लगेच नवऱ्याला जाब विचारला. त्यावेळी त्याने सांगितलं, की दोन महिन्यांपासून त्यांची घरकाम करणारी मावशी कोरोनाच्या भीतीने घरकामासाठी येत नाही. त्यातच चार-पाच वर्षांपासून लग्नही ठरत नव्हते. मग नाईलाजाने त्याने भांडी घासायचे फोटो (Photo) साईटवर टाकले. तेव्हा कोठे लग्न ठरले. (SL Khutwad Writes about Coronavirus)

मात्र, फोटो काढण्यापुरतीच त्याने भांडी घासली होती. साहेब, भांडी घासायला न येताही त्याचे फोटो काढून एका सुंदर मुलीची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक करावी, ही विनंती. साहेब, हल्ली मास्क कंपलसरी आहे. मात्र, याचाच फायदा घेऊन नवऱ्या मुलाने माझी फसवणूक केली. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमावेळी मुलासह सासरच्यांनी मास्क घातले होते. त्यातच मी केलेल्या पोह्यांचे नेहमीप्रमाणे ‘उप्पीट’ झाले होते. आता त्यांनी जर असले पोहे खाल्ले असते तर त्यांनी मला तिथल्या तिथे नापास केले असते. मात्र, ‘लग्न झाल्याशिवाय मुलीकडच्या घरचे आम्ही पाणीही पित नाही.’ असे नवऱ्या मुलाने सांगितल्याने माझा जीव भांड्यात पडला. मात्र, मला पाहताना नवऱ्या मुलाने मास्क का काढला नाही?, पोहे का खाल्ले नाहीत? इतकंच काय पण भांडी घासतानाही त्याने मास्क का लावला होता, याचे कोडे मला लग्नानंतर उलगडले. त्या मुलाला दातच नव्हते. याचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत, हे मी ओळखले. त्यातच दोन तासांत लग्न उरकायचे असल्याने मी मेकअपकडे बघू का याच्या दातांकडे लक्ष देऊ? त्या दोन तासांत एकदाही त्याने मास्क हनुवटीवर येऊ दिला नाही.

Panchnama
बारामतीकरांना काहीसा दिलासा; पण उद्यापासून कडक लॉकडाऊन

एखादी बाई जसा सारखा पदर सावरते ना, अगदी तसा तो मास्क सावरत होता. तरी म्हटले सासरची मंडळी माझ्याकडे बघून दात का काढतायत. लग्नानंतर खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची बत्तीसी त्याच्या हातात द्यावीशी वाटली. पण एकही दात नसणाऱ्याची बत्तीशी कशी हातात देणार? त्यामुळे गप्प बसले. साहेब, लग्नानंतरही सोशल डिस्टन्स पाळायला हवे म्हणून मी आमच्यात सहा फुटांचे अंतर राहील, याची काळजी घेत आहे. लग्नाआधी त्याने सगळं खरं खरं सांगायला हवं होतं. मी पण त्याला माझी पाच-सहा प्रेमप्रकरणे सांगणारच होते. पण आता कशाला सांगू? मी डबल ग्रॅज्युएट झाली आहे, असे सांगितले होते. वास्तविक मी दहावी तीन वेळा फेल आहे, हेही मी त्याला सांगणार होते! पण आता कशाला सांगू? मला कोणी काम सांगितले, की माझ्या डोक्यात तिडिक जाते व रागाच्या भरात जे हातात येईल ते मी फेकून मारते. पण मी हे त्याला आता कशाला सांगू! साहेब, नवऱ्याने व सासरच्या मंडळींनी माझी कोरोनाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना अशी अद्दल घडवा, की सगळे जण आयुष्यभर माझ्या ताटाखालचे मांजर झाले पाहिजेत. तुम्ही माझ्यासाठी एवढे करावे, ही ‘दात जोडून’...सॉरी हात जोडून विनंती.

कळावे,

आपली विश्वासू,

नताशा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com