esakal | नवऱ्याचा भवरा

बोलून बातमी शोधा

Panchnama
नवऱ्याचा भवरा
sakal_logo
By
सु. ल. खुटवड

फक्त पंचवीस माणसांमध्येच लग्न कसं उरकायचं, याचं टेन्शन नवरदेव समीरवर आलं होतं. त्यानं दहा-दहा वेळा यादी तपासली; पण ती शंभरच्या आतमध्ये काही येत नव्हती. एकाही माणसाला वगळणं अवघड झालं होतं. आपण स्वतःच या यादीतून कट व्हावं काय, असंही त्याला क्षणभर वाटलं.

त्यातच दोन तासांत काय काय उरकायचं, हाही प्रश्‍न आला होता. नागीन डान्सलाच दोन तास पुरत नाहीत, हे त्याने पाहिले होते. दोन तासांत लग्न उरकणार असेल, तर सुटीची तरी काय गरज आहे. ‘हाफ डे’ टाकून ऑफिसला जावं काय? असंही त्याच्या मनात आलं. नवरी मुलगी शिवानीलाही वेळेचं टेन्शन आलं होतं. मेक-अपसाठी तिने तीन तास राखीव ठेवले होते; पण नव्या नियमांमुळं मेक-अपवर पाणी फेरले होते. आता फक्त तोंड धुऊन लग्नाला उभं राहणं शक्य होतं. मग दोन्ही घरची बैठक झाली. त्यात कशीबशी पंचवीस माणसांची यादी तयार झाली. त्यात नियमावलीही तयार केली. सकाळी अकराला लग्न असल्याने सगळ्यांनी बरोबर दहाला मंगल कार्यालयात उपस्थित राहावे. दहा वाजून दोन मिनिटांनी कोणीही आले तरी त्याला आत सोडायचे नाही, असे एकमुखाने ठरले. रूसण्या-फुगण्यात कोणीही वेळ घालवायचा नाही. चुकून कोणी रूसल्यास त्याला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात येईल, यावर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा: बेड मिळेना म्हणून पुण्याच्या रुग्णाने रात्रीत गाठली सांगली

नवरा-नवरीला तयार होण्यासाठी फक्त दहा मिनिटे दिली जातील. ‘नवरी मुलीला मामाने घेऊन यावे’, असं एकदाही माईकवरून पुकारण्यात येणार नाही. आपली वेळ संपण्याआधीच बोहल्यावर दोघांनी उपस्थित राहावे. जादा वेळ लागल्यास वाट न बघता जो कोणी एकटा उपस्थित असला तरी लग्नाला सुरुवात होईल. लग्नाआधी मानपान, सत्कार या कार्यक्रमांना फाटा देण्यात येत असून, आठवड्याच्या आत आपला मानपान कुरिअरने घरी पाठवला जाईल. लग्नात नवरदेवाचे बूट चोरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसे झाल्यास या चोरीची फिर्याद पोलिस ठाण्यात देण्यात येईल. वेळेअभावी अक्षता वाटप केल्या जाणार नाहीत. प्रत्येकाने आपापल्या घरूनच त्या घेऊन याव्यात, वऱ्हाडी मंडळींनीच काय पण नवरा-नवरीनेही सोशल डिस्टन्स पाळायला हवे. याचे कोणीही उल्लंघन केल्यास त्याला मंगल कार्यालयाबाहेर काढले जाईल, नवरदेवाला श्रीवंदनेला नेताना नागीन डान्स, मोर डान्स आदी नृत्य प्रकारांना बंदी घालण्यात आली आहे. नवरदेवाच्या मित्रांनी घरीच हे डान्स करावेत व श्रीवंदनेवेळी ते व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकावेत. ही नियमावली अंतिम करून, मंगल कार्यालयात दर्शनी भागात ती लावण्यात आली. ठरल्याप्रमाणे वऱ्हाडी मंडळींसह नवरा-नवरीही बरोबर दहाच्या ठोक्याला मंगल कार्यालयात उपस्थित राहिले. त्यानंतर कार्यालय प्रमुखाने शिरगणती केली. ती बरोबर पंचवीस भरली.

त्यानंतर कार्यालयाबाहेर हार घातलेला ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लावला व बाहेर दोन सुरक्षारक्षक तैनात केले. थोड्या वेळाने नवरदेव समीरचा जिवलग मित्र दिनेशचा फोन आला. ‘अरे मी बाहेर आलोय. मला हे सुरक्षारक्षक आत सोडत नाहीत.’ त्याला आणण्यासाठी समीर बाहेर गेला. मात्र, तेवढ्यात डोळा चुकवून दिनेश आतमध्ये घुसला होता. मात्र, परत आत जाण्यासाठी समीरला सुरक्षासक्षक सोडेनात. ‘अरे मी नवरदेव आहे’ असे त्याने दहा-बारा वेळा सांगितले. ‘असे सांगून अनेक जण आतमध्ये गेलेत.’ असे सुरक्षारक्षकाने सांगितले. लगेच दुसऱ्या सुरक्षारक्षकाने आतमध्ये जाऊन शिरगणती केली. ती बरोबर पंचवीस भरली. त्यामुळे समीरला आतमध्ये सोडले नाही. थोड्याच वेळात ‘शुभ मंगल सावधान...’ चे स्वर त्याच्या कानावर पडल्याने त्याला चक्कर आली.